किल्ले सिंधुदुर्गवरील कामाची वैभव नाईक यांच्याकडून पाहणी…

16
2

शासकीय विश्रामगृह नूतनीकरणाचीही पाहणी ; आवश्यक कार्यवाहीच्या सूचना…

मालवण, ता. ३ : सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराची दुरूस्ती व नूतनीकरणाचे काम सुरु आहे. त्याचबरोबर या शिवराजेश्वर मंदिरात दगडात कोरलेले भव्य सिंहासन साकारण्यात आले आहे. याठिकाणी आज आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. त्याचबरोबर मालवण येथील शासकीय विश्रामगृहाचे देखील नूतनीकरण करण्यात येत आहे. त्या कामाची देखील पाहणी आमदार नाईक यांनी करत आवश्यक सूचना केल्या.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे देशातील एकमेव शिवराजेश्वर मंदिर आहे. या ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिराच्या दुरूस्ती व नूतनीकरणाच्या कामासाठी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात १ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तसेच शिवराजेश्वर मंदिरातील सिंहासनासाठी आमदार वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दगडात कोरलेल्या भव्य सिंहासनाचे काम कोल्हापूर येथील तज्ञ कारागीर अशोक सुतार आणि सहकारी यांनी केले आहे. त्यांनी अनेक ऐतिहासिक कामे केली असून कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरातील नवीन मूर्ती देखील त्यांनीच साकारली आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, शहरप्रमुख बाबी जोगी, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, किल्ले प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत, स्वप्नील आचरेकर आदी उपस्थित होते.

4