तोंडवळी शिक्षकप्रश्नी पालकांनी विद्यार्थ्यांसह छेडले आंदोलन…

2

शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत सभापतींकडून तीव्र नाराजी ; शिक्षक दिल्याने आंदोलन मागे…

मालवण, ता. २२ : तोंडवळी खालची येथील पूर्ण प्राथमिक शाळेस आश्वासन देऊनही शिक्षक न दिल्याने आज संतप्त पालकांनी मालवण पंचायत समितीवर धडक देत आंदोलन छेडले. अखेर यशस्वी चर्चेनंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक उपलब्ध करून दिल्याने पालकांनी आंदोलन मागे घेतले.
तोंडवळी खालची पूर्ण प्राथमिक शाळेस चार शिक्षकांची पदे मंजूर असताना केवळ दोन शिक्षक कार्यरत आहेत. मुख्याध्यापक पूरपरिस्थितीत अडकल्याने आठ दिवस एकाच शिक्षकाला शाळेचे कामकाज पहावे लागले. शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने आम्ही शिक्षण विभागाचे लक्ष वेधले. कायमस्वरूपी शिक्षक द्यावा अशी मागणी करूनही त्याची कार्यवाही झाली नाही असे शालेय व्यवस्थापन समितीच्या नागेश कोचरेकर यांनी सांगितले. चार दिवसांपूर्वी सभापती सोनाली कोदे, उपसभापती अशोक बागवे, गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत, विस्तार अधिकारी उदय दीक्षित यांची भेट घेतली असता त्यांनी बुधवारपर्यंत शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल असे आश्‍वासन दिले. त्याची कार्यवाही न झाल्यानेच आज आम्हाला विद्यार्थ्यांसह पंचायत समिती कार्यालयावर धडक देत आंदोलन छेडावे लागले. जोपर्यंत प्रशालेस शिक्षक उपलब्ध करून दिला जात नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा इशारा कोचरेकर यांच्यासह अन्य पालकांनी दिला.
बैठकीस गेलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. यावेळी सभापती सोनाली कोदे, उपसभापती अशोक बागवे, स्वाभीमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, दादा नाईक यांनी गटशिक्षणाधिकारी श्री. राऊत यांना शिक्षकाचा प्रश्‍न तत्काळ सोडवावा असे सांगितले. शिक्षण विभागाचा कारभार डळमळीत असल्यानेच आज तालुक्यात शिक्षकांचा प्रश्‍न ऐरणीवर आला असल्याचे सांगत सभापती कोदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर गटशिक्षणाधिकारी राऊत यांनी बंडू राठोड हे शिक्षक उपलब्ध करून देऊ असे सांगत त्याची कार्यवाही केली. त्यामुळे पालकांनी आंदोलन मागे घेतले. आंबेरी शाळेतील शिक्षकास तोंडवळी खालची प्राथमिक शाळेवर काढलेली कामगिरी रद्द करण्याची मागणी पालकांनी केली.

4