अंकुश जाधव ;समाजकल्याण सभेत आरोप…
सिंधुदुर्गनगरी ता.२३:
समाज कल्याण विभागाला बांधकाम व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अपेक्षित सहकार्य लाभत नाही. कामांची अंदाजपत्रके मिळत नसल्याने निधी खर्च घालण्यात अडचण निर्माण होते. काही दिवसात विधानसभेची आचारसंहिता लागेल. त्यापूर्वी आम्हाला विभागाचा २० टक्के व ५ टक्के निधी खर्चासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे अंदाजपत्रके तयार करून दया. तुमच्यामुळे निधी अखर्चित राहिल्यास आमची समिती खपवून घेणार नाही, अशा सूचना सभापती अंकुश जाधव यांनी शुक्रवारी झालेल्या समाजकल्याण सभेत दिल्या.
समाजकल्याण समितीची सभा सभापती जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्रभारी अधिकारी वासुदेव नाईक, सदस्य संजय पडते, पंकज पेडणेकर, जयश्री आडीवरेकर, शारदा कांबळे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी समाज कल्याण विभागाकडील २० टक्के व ५ टक्के निधिमधील योजनांसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली. तसेच कमी पडणारे प्रस्ताव तात्काळ परिपूर्ण सादर करण्याचे आदेश तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना सभापती जाधव यांनी दिले. यावेळी ग्रासकटर, घरघंटी, शिलाई मशीन, अनुसूचित नवबौद्ध विकास कामांचा समावेश आहे.
रानबांबुळी मागासवस्ती होणार स्मार्ट सिटी
राज्य शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मागासवर्गीय वस्ती स्मार्ट सिटी बनविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रस्ताव मागविला आहे. यासाठी रानबांबुळी मागास वस्तीचा प्रस्ताव शासनाला पाठवावा, असे आदेश सभापती जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिले.