जानवली गोळीबार प्रकरणी रविकांत राणेला जामीन मंजूर…

2

कणकवली, ता.२३:डुक्कराची शिकार करताना बंदुकीची गोळी लागून जानवली येथील जंगलात सखाराम मेस्त्री यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी रविकांत उर्फ बाबू राणे याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 16 ऑगस्टला सायंकाळी साडे पाचच्या सुमारास रविकांत राणे याने बंदुकीतून मारलेली गोळी सखाराम मेस्त्री यांच्या डोक्याला लागली होती. त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्याच दिवशी रविकांत राणे याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची चार दिवस पोलिस कोठडीत तर नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
रविकांत राणे याच्यावतीने अ‍ॅड.उमेश सावंत यांनी ओरोस येथील जिल्हा न्यायालयात बाजू मांडली. 16 ऑगस्टला रविकांत राणे (वय 50) याच्यासमवेत त्याचे तीन पुतणे तसेच जानवली गावठाणवाडीतील सखाराम मेस्त्री (वय 48) हे जानवलीतील फणसुली जंगलात डुक्कर मारण्यासाठी गेले होते. यावेळी डुक्कराच्या दिशेने झाडलेली गोळी सखाराम मेस्त्री यांच्या डोकीस लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्याच दिवशी सायंकाळी साडे सात वाजता रविकांत राणे हा बंदूकीसह पोलिस ठाण्यात हजर झाला होता. त्याच्याविरोधात पोलिसांनी भा.दं.वि.304 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

2

4