ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे चतुर्थीसणाची कामे थांबली

306
2

आंदोलनाला स्थगिती देण्याची सरपंचांची मागणी ः गटविकास अधिकार्‍यांना निवेदन

कणकवली, ता. 23 ः ग्रामसेवकांनी अचानकपणे काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे गावातील स्ट्रीट लाइट, रस्ते सफाई, खड्डे बुजविणे आदी कामांबरोबरच गणपती सणासाठी येणार्‍या चाकरमान्यांकडून होणारी घरपट्टी व पाणीपट्टी वसुली करणे थांबणार आहे. तसेच चतुर्थीसणापूर्वी होणार्‍या कामांवरही परिणाम होत आहे. तसेच पुढील काळात विधानसभेची आचारसंहिता लागणार असल्याने सर्वच कामे ठप्प होणार आहेत. त्यामुळे ग्रामसेवकांच्या आंदोलनाला स्थगिती द्यावी अशी मागणी कणकवली तालुक्यातील सरपंचांनी आज गटविकास अधिकार्‍यांची भेट घेऊन केली.
सरपंचांनी गटविकास अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, आचारसंहिते पूर्वी निविदा प्रक्रिया मंजूर झाल्या तर गावच्या विकासाला गती येणार आहे. मात्र ग्रामसेवकांच्या संपामुळे ही कामे लांबणीवर पडली तर अनेक विकास कामांचा खोळंबा होणार आहे. ग्रामपंचायतींना आलेला निधी देखील रद्द होण्याची शक्यता आहेत. याबाबत आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय व्हावा अन्यथा वरिष्ठ कार्यालयाच्या पातळीवर आम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार करून धरणे आंदोलने करावी लागतील असा इशारा देखील सरपंचांनी निवेदनातून दिला आहे. आज गटविकास अधिकार्‍यांची भेट घेतलेल्या सरपंचांमध्ये वाघेरी सरपंच संतोष बाजीराव राणे, फोंडाघाट सरपंच संतोष वसंत आग्रे, पिसेकामते सरपंच सुहास शिवराम राणे, नांदगाव सरपंच आफरोजा नावलेकर, आशिये सरपंच रश्मी बाणे, हळवल सरपंच दीपक गुरव, ओटव सरपंच हेमंत परुळेकर, कुरंगावणे सरपंच सरिता पवार, बेळणे सरपंच दीक्षा चाळके, चिंचवली सरपंच रुजी भालेकर, शिरवल सरपंच महेश शिरवलकर आदी उपस्थित होते.

4