कुडासे खुर्द मधील सदस्यांचे स्पष्टीकरण; गाव विकास पॅनल म्हणूनच काम करणार
दोडामार्ग ता.२६: गावातील विकास कामांना निधी मिळावा यासाठी संबधित कामांची यादी घेऊन आम्ही शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना भेटलो. मात्र कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. असे स्पष्टीकरण कुडासे खुर्द मधील पाच ग्रामपंचायत सदस्यांनी दिले आहे.आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपला सत्कार करण्यात आला. परंतु आम्ही ग्रामविकास पॅनल म्हणूनच कार्यरत राहणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
काल सावंतवाडी येथे श्री केसरकर यांच्या उपस्थितीत काही नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच – उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार तर काहींचा प्रवेश घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर कुडासे खुर्द येथील सदस्यांनी त्या ठिकाणी भेट घेतली होती. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर सदस्य श्रद्धा नाईक, राजन गवस, सानवी दळवी,अमिता राणे आणि विवेक पालव यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण त्या ठिकाणी गावातील विकास कामांना निधी मिळावा या उद्देशाने कामाची यादी घेऊन केसरकर यांच्या कार्यालयात गेलो होतो. त्या ठिकाणी आमचा सत्कार करण्यात आला. मात्र आम्ही कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. आम्ही गाव विकास पॅनल म्हणून निवडून आलो आहोत आणि यापुढे ग्रामविकास पॅनल म्हणूनच काम करणार आहोत.