चार दिवसाची पोलिस कोठडी ः शिवडावच्या तरुणाला लाखाचा गंडा
कणकवली, ता. 23 ः नोकरीला लावतो असे सांगून शिवडाव येथील एका तरुणाला दीड लाख रुपयांचा गंडा घालणार्याला आज कणकवली पोलिसांनी अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस तपासात त्याच्याकडून आणखी फसवणुकीचे कारनामे उघड होण्याची शक्यता आहे. श्रीकृष्ण श्यामसुंदर कुडतरकर (रा.तोंडवली, ता.कणकवली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने विशाल श्रीधर शिरसाट (ता.शिवडाव चिंचाळवाडी) या तरुणाकडून 1 लाख 43 हजार रूपये घेतले होते.
शिवडाव येथील विशाल श्रीधर शिरसाट या तरुणाला जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीला लावतो असे आमिष आरोपी श्रीकृष्ण श्यामसुंदर शिरसाट याने दाखवले होते. त्याबदल्यात त्याने शिरसाट याच्याकडून टप्पाटप्प्याने 1 लाख 44 हजार रुपयांची रक्कम उकळली होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विशाल शिरसाट याने रक्कम मागे देण्यासाठी श्रीकृष्ण कुडतरकर याच्याकडे तगादा लावला होता. यात 44 हजार रुपयांची रक्कम कुडतरकर याने मागे दिली. मात्र उर्वरित 99 हजार रुपयांची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने विशाल शिरसाट याने कुडतरकर याच्या विरोधात कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार श्रीकृष्ण कुडतरकर याला आज कणकवली पोलिसांनी कुडाळ बाजार येथून ताब्यात घेतले. सहाय्यक पोलिस निरीक्षक बापू खरात यांच्या पथकाने ही कारवाई केली.