मग महाराष्ट्रात घरगुती सिलेंडर ४५० रूपयाला का नाही..?

5
2

इर्शाद शेख; मोदी सरकारने लोकांना लुटले, जिल्हा काँग्रेसची टीका…

वेंगुर्ले,ता. २८: राजस्थानमध्ये सत्ता आल्यास ४५० रुपयात घरगुती सिलेंडर उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देणारे मोदी सरकार महाराष्ट्रात मात्र ११०० रुपयाला सिलिंडर देते? असा सवाल सिंधुदुर्ग काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केला आहे. सर्वसामान्य जनतेला लुटण्याचे काम मोदी सरकार करत आहे. याबाबत भाजपची कोणीही मंडळी साधा ब्र काढायला तयार नाही. त्यांच्या या भूमिकेमध्ये सर्वसामान्य लोकांचे बजेट पूर्णता कोलमडले आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
यात असे म्हटले आहे की, भाजपची केंद्रात २०१४ मध्ये सत्ता आल्यापासून ४१० रुपयात मिळणारा सिलेंडर आता ११०० रुपयांच्या पार गेला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. सामान्य गृहिणींचे गृहखर्चाचे बजेट पूर्ण कोलमडले आहे. अशा परिस्थितीत फक्त निवडणूक जिंकण्यासाठी राजस्थानात गॅस सिलिंडर ४५० रुपयात देण्याचे आश्वासन देणे आणि भाजपचेच सरकार असलेल्या महाराष्ट्रात जनतेला घरगुती गॅस सिलिंडर ११०० रुपयांपेक्षा जास्त किंमतीला विकत घ्यावा लागणे हा मोदींचा महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय आहे. जर भाजपला राजस्थानात भाजपची सत्ता आली तर घरगुती गॅस सिलिंडर ४५० रुपयांना देणे शक्य असेल तर भाजपचे सरकार असलेल्या महाराष्ट्रात का नाही?.
भाजप राजस्थानात सत्तेत आली तर ४५० रुपयात घरगुती गॅस सिलिंडर देणार आहे का? की निवडणूक जिंकण्यासाठीची ही जुमलेबाजी आहे. कारण देशातील जनतेचा भाजपवर विश्वास राहिलेला नाही कारण भाजप निवडणूका जिंकण्यासाठी कोणतीही खोटी आश्वासने जनतेला देते आणि निवडणूका जिंकल्यावर ती आश्वासने पूर्ण तर करत नाहीच त्याबद्दल एक अवाक्षरही काढत नाही जसे मोदींनी २०१४ ला भाजपची सत्ता आली तर प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये, वर्षाला २ कोटी लोकांना रोजगार, शंभर स्मार्ट सीटी अशी बरीच काही आश्वासने दिली होती. स्वीस बँकेतील काळा पैसा आणणार आणि त्यातून नोकरी करणाऱ्या लोकांना काही टक्के इन्कमटॅक्स मध्ये सूट देणार स्वीस बँकेतील काळा पैसा काही आला नाही उलट स्वीस बँकेतील भारतीयांचा पैसा कितीतरी पटीने वाढला आहे मग हा काळा पैसा आहे का? आणि हा कोणाचा आहे आणि मोदी सरकार सत्तेत आल्यावर यात वाढ कशी झाली?
पेट्रोल डिझेलचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झाल्यावरही त्याचा फायदा मोदींनी कधीही जनतेला मिळू दिला नाही. पेट्रोल व डिझेलचे भाव चढे ठेवून देशातील जनतेला प्रचंड लुटण्याचे काम मोदी सरकारने केले. त्याबद्दल मोदीच काय भाजपची कोणीही मंडळी त्यावर ब्र काढत नाहीत. अशी टिका सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली आहे.

4