नौदलकडून मालवणचा अनोखा सन्मान…

19
2

कोचीन मध्ये आयएनएस “मालवण” युद्ध नौकेचे जलावतरण; अन्य दोन युद्धनौकांचे जलावतरण…

मालवण,ता.०१: येथील तारकर्लीच्या समुद्रकिनारी येत्या ४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नौदल दिन साजरा होत आहे. या सोहळ्याच्या पूर्वीच नौदलाने मालवणाचा सन्मान केला आहे. मालवण नावाच्या पाणबुडी विरोधी युद्धनौकेचे काल कोचीन येथे जलावतरण करण्यात आले.

नौदलाने ताफ्यात दाखल करून घेतल्यानंतर आयएनएस मालवण अशी ओळख असणारी पाणबुडी विरोधी युद्ध पद्धतीची युद्ध नौका असणार आहे. पाणबुडीविरोधी लढा देण्यासाठी अशा युद्धनौकांची नौदलाला गरज होती. या युद्ध नौका उभारणीचे कंत्राट सार्वजनिक क्षेत्रातील कोचीन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. त्यातीलच मालवणसह अन्य दोन युद्ध नौकांचे काल जलावतरण करण्यात आले. कोचीन शिपयार्ड मध्ये अशा प्रकारे आठ युद्ध नौकांची बांधणी होत आहे. यापैकी तीन युद्ध नौकांची बांधणी पूर्ण झाली असून त्यांचे काल एकाच वेळी जलावतरण झाले. या तीन युद्ध नौकांचे नाव मालवण, मंगरोल व माहे अशी आहेत. मंगरोल हे शहर गुजरातच्या किनारपट्टीवर तर माहे हे केरळ जवळील समुद्रकिनारी असलेले शहर आहे. तिन्ही युद्ध नौकांचे नाव समुद्रकिनारी असलेल्या शहरांच्या नावे देण्यात आली आहेत. अशी माहिती नौदलाकडून देण्यात आली.

मालवणचे जलावतरण दक्षिण कमांडचे प्रमुख व्हाईस ऍडमिरल सुरज बेरी यांच्या पत्नी कंगना बेरी यांच्या हस्ते तर मंगरोलचे जलावतरण उपनौदल प्रमुख व्हाईस ऍडमिरल संजय सिंह यांच्या पत्नी झरीन लॉर्ड सिंह यांच्या हस्ते तर माहेचे जलावतरण भारतीय नौदल अकादमीचे प्रमुख व्हाईस ऍडमिरल पुनीत बहल यांच्या पत्नी अंजली बहल यांच्या हस्ते करण्यात आले.

4