शासनाकडुन चौकशीचे आदेश:स्थानिक ऐवजी विदेशी रोपांचे वितरण केल्याचा आरोप…
सावंतवाडी/दत्तप्रसाद पोकळे ता.२४: राज्यात यंदा १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवडीचे अभियान राबविले जात आहे.मात्र या अभियानासाठी रोपांचे वितरण करताना वनविभागाच्या रोपवाटीकांनी शासनाच्याच नियमांचे उल्लंघन केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
जैवसाखळी अबाधित रहावी व पर्यावरणाचे संतुलन राखले जावे,यासाठी ३३ कोटी वृक्ष लागवडीसाठी स्वदेशी प्रजातीचे रोप कायद्याने बंधनकारक असताना,वनविभागाच्या नर्सरीमधून चक्क विदेशी प्रजातीच्या रोपांचे वितरण करण्यात आले आहे.यातील काही विदेशी रोप तर पर्यावरण विघातक आहेत.६ कोटीच्यावर विदेशी प्रजातीचे रोपांचे वाटप करण्यात आले असून,हा धक्कादायक प्रकार उघड होताच,राज्य शासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.याबाबतची माहिती वनशक्तीचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी दिली.
महाराष्ट्रात सध्या वनाखालील क्षेत्र २० टक्के एवढे आहे,मात्र राष्ट्रीय वन धोरणानुसार वनाखालील क्षेत्र ३३ टक्के असणे आवश्यक आहे.त्यामुळे वनक्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाने ५० कोटी वृक्षलगवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे.५० कोटी वृक्षलागवडीतील तिसरा टप्पा ३३ कोटी वृक्षलागवडीचा आहे.यात वनविभाग,सामाजिक वनीकरण आणि वन विकास महामंडळ या वनविभाग आणि अखत्यारितील शाखांमार्फत १८ कोटी ७५ लाख वृक्ष लागणार आहेत. यात वन विभाग ७.२९ कोटी, सामाजिक वनीकरण शाखा ७.२९ कोटी आणि वन विकास महामंडळ ४.१७ कोटी वृक्ष लावणार आहे. इतर यंत्रणांना यामध्ये ६.२५ कोटी तर ग्रामपंचायतींना ८ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.ही वृक्षलागवड करताना स्वदेशी प्रजातीचे रोप उपयोगात आणण्याचे आदेश राज्यशासनाने २०१७ मध्ये दिले होते.मात्र हे आदेशच वनविभाग व त्यांच्या नर्सरीने धाब्यावर बसविले आहेत.३३ कोटी वृक्ष लागवडीसाठी स्वदेशी प्रजातीचे रोप कायद्याने बंधनकारक असताना,वनविभागाच्या नर्सरीमधून चक्क विदेशी प्रजातीच्या रोपांचे वितरण करण्यात आले आहे.या विदेशी प्रजातीच्या वृक्षारोपणाने इको सिस्टिमला कोणताच फायदा होत नाही,उलट या प्रजातींमुळे मातीची गुणवत्ता,वनस्पती व स्थानिक वृक्षांच्या वाढीस पायबंद होऊ शकतो,त्यामुळे ३३ कोटी वृक्ष लागवडीसाठी स्वदेशी प्रजातीचे रोप वितरित करण्याचे आदेश देण्यात आले होते.मात्र वनविभागाच्या रोपवाटीकांनी १.३९ कोटी काशीद,१.२३कोटी गुलमोहर,६१.३४ लाख पेलोपथोरम,१३.०५ सप्तपर्णी या विदेशी प्रजातींचे रोप तयार करून त्याचे वितरण केले आहे.हा प्रकार उघड होताच राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी सर्व वनवृत्त अधिकाऱ्यांना पत्र लिहून चौकशीचे आदेश दिले आहेत.वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी आहे, हे दर्शविण्यासाठी या विदेशी प्रजाती लावल्या जात आहेत.त्या वेगाने वाढतात परंतु त्यांचे पर्यावरणीय मूल्य नगण्य आहे.उपग्रह प्रतिमांमध्ये ग्रीन कव्हर वाढलेले दर्शविण्यासाठी,असे प्रकार केले जात आहेत,अशी टीका वनशक्तीचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी केली आहे.