दोन मोटरसायकलींमध्ये समोरासमोर धडक ; पती, पत्नी जखमी…
दोन्ही मुले सुदैवाने बचावली : कांदळगाव येथील घटना…
मालवण, ता. २४ : कांदळगाव येथील रस्त्यावर दोन मोटरसायकलींमध्ये झालेल्या अपघातात पती, पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यांच्या दोन्ही मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही. सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कांदळगाव येथील नंदकिशोर राणे हे पत्नी रिया राणे, मुलगी दुर्वा, मुलगा दुर्वेश यांना घेऊन मोटारसायकलने कांदळगावहून मालवण येथे येत होते तर कांदळगाव येथील लवेश आयकर हा मोटरसायकलने कांदळगाव येथे जात होता. अनंताश्रमलगतच्या रस्त्यावर या दोन्ही मोटरसायकलमध्ये समोरा समोर जोरदार धडक बसली. यात नंदकिशोर व त्यांची पत्नी रिया रस्त्यावर फेकले गेले. यात नंदकिशोर यांच्या पायास तर पत्नी रिया यांच्या चेहर्यास गंभीर दुखापती झाल्या. सुर्दैवाने त्यांच्या दोन्ही मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही.
अपघाताची माहिती मिळताच तेथून येणाऱ्या कांदळगावचे माजी सरपंच रणजित परब यांनी संदीप परब, रुपेश लाड, सविता पाटकर, योगेश लाड, राकेश लाड, बाबू बागवे यांच्या मदतीने ओमनीतून त्यांना तत्काळ मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद येथील पोलिस ठाण्यात झालेली नाही.