शहरवासीयांना अंधारात ठेवून विकास आराखड्याला मंजूरी…

4
2

सुशांत नाईक; नितेश राणेंनी आराखडा प्रसिद्ध करू न दिल्याचा आरोप…

कणकवली, ता.९: शहर विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. मात्र जमिनीची दलाली करणारी काही मंडळी आणि आमदार नीतेश राणे यांनी दबावापोटी हा आराखडा अद्यापही प्रसिद्ध करू दिलेला नाही असा आरोप नगरपंचायतीचे तत्‍कालीन विरोधी पक्षनेते आणि युवासेना जिल्‍हा प्रमुख सुशांत नाईक यांनी आज केला.
श्री.नाईक यांनी पत्रकात म्‍हटले की, कणकवली शहरात २० हेक्‍टर सलग जागा उपलब्‍ध झाली तर तेथे शासनाच्या खर्चाने प्लाटिंग, रस्ते, गटार आदी विविध सुविधा उपलब्‍ध करून दिल्या जाणार आहेत. त्‍याअनुषंगाने शासनाकडून २० हेक्‍टर जागेबाबत जमीन मालकांकडून मागणी करण्यात आली आहे. शहर विकास आराखडा मंजूर झाल्‍याने शासनाने कणकवली शहरासाठी नवी ‘नगर विकास योजना’ लागू केली आहे. परंतु आमदार नीतेश राणे आणि नगरपंचायतीमधील तत्‍कालीन सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी याबाबतची कोणतीही माहिती शहरवासीयांना दिलेली नाही.
श्री.नाईक म्‍हणाले, कणकवली शहराचा सुधारित विकास आराखडा आधी जनतेसाठी खुला करायला हवा. त्‍यावर सूचना आणि हरकती आल्‍यानंतरच तो मंजूर व्हायला हवा. परंतु तशी कोणतीही कार्यवाही शासनाकडून करण्यात आलेली नाही. एका बाजूला गुपचूप शहर विकास आराखडा मंजूर करायचा आणि या मंजूर झालेल्‍या आराखड्यानुसार ‘नगर विकास योजना’ राबवायची अशी शहरवासीयांची दुहेरी फसवणूक सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे. मात्र शहरवासीयांची होणारी ही फसवणूक आम्‍ही खपवून घेणार नाही. जमिनीच्या दलालांसाठी शहरवासीयांची फसवणूक करण्याचा प्रकार झाला तर आम्‍ही युवासेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडणार आहोत.

4