वेंगुर्ला येथे २२ व २३ डिसेंबरला बालकुमार साहित्य संमेलन…

6
2

वेंगुर्ले,ता.०९: आनंद यात्री वाङ्मय मंडळ यांच्या वतीने वेंगुर्ला येथे २२ व २३ डिसेंबरला बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष स्थान अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मदन हजेरी भूषवणार आहेत तसेच राज्यातील अन्य लेखकांची उपस्थिती असणार आहे.

साहित्यातील विविध भावभावनांच्या परिपोषातून व वैचारिक वाङ्ममयाच्या विचारधारेतून मुलांच्या मनःपिंडाचे पोषण होत असते. त्यासाठी विद्यार्थ्याना साहित्याची आवड निर्माण व्हावी, ललित साहित्याविषयीची अभिरूची निर्माण व्हावी, मुलानी अवांतर वाचन करावे, नामवंत साहित्यिकांशी मुलांची भेट घडवून आणावी ही व अशीच अन्य उद्दिष्टे समोर ठेवून आनंदयात्री वाङ्मय मंडळाने बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे.

शुक्रवारी २२ डिसेंबरला सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत श्री देव जैतीर देवस्थान ते श्री शिवाजी हायस्कूल तुळस अशी ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. शनिवारी २३ डिसेंबरला बाल साहित्य संमेलन च्या मुख्य दिवशी सकाळी १० ते १२ या वेळेत उद्घाटन कार्यक्रमात मान्यवरांचे व अध्यक्षांचे मार्गदर्शन होणार आहे. ‘कवितेच्या गावा’ या विद्यार्थ्यानी सादर केलेल्या कार्यक्रमात प्रस्थापित कवींनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कवितांचे विद्यार्थ्यानी केलेले सादरीकरण होईल. ३.२० ते ४.१० या वेळेत ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमांतर्गत मान्यवर लेखकांशी विद्यार्थ्यांच्या गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. ४.१० ते ५.०० या वेळेत समारोपाच्या कार्यक्रमात पारितोषिक वितरण, अध्यक्षीय समारोप होणार आहे. याप्रसंगी विद्यार्थ्यांसह पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

4