थकीत वीज बिलाच्या वसुलीस गेलेल्या वायरमनला मारहाण…

442
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सरकारी कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू…

मालवण, ता. २४ : थकीत वीज बिलाची वसुली करण्यास गेलेल्या महावितरणच्या वायरमनला रमेश चव्हाण याने गंभीर मारहाण केल्याची घटना आज सायंकाळी कुंभारमाठ फोंडेकरवाडी येथे घडली. जखमी वायरमन दिगंबर मातले यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयित आरोपी चव्हाण यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिस ठाण्यात सुरू आहे.
महावितरणचे वायरमन दिगंबर मातले हे सहकारी संदेश मेस्त्री यांच्यासमवेत कुंभारमाठ फोंडेकरवाडी येथील रमाकांत विश्‍वास चव्हाण यांच्या थकीत विजबिलाच्या वसुलीस गेले होते. तेथे असलेल्या चव्हाण यांना बिल भरण्यास सांगितले असता संशयित आरोपी रमेश चव्हाण याने वायरमन मातले यांना मारहाण केली. यात नाकातून रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे गुरुदास भुजबळ, योगेश खैरे अन्य कर्मचारी ग्रामीण रुग्णालयात आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील, हेमंत पेडणेकर, मंगेश माने यांनी ग्रामीण रुग्णालयात जात घटनेची माहिती दिली. मातले यांची फिर्याद घेतल्यानंतर संशयित आरोपी रमेश चव्हाण याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

\