जिद्द, चिकाटी व मेहनत हे गुण आत्मसात करत वाटचाल करा

2

संदेश पारकर; सिंधुदुर्ग जिल्हा कुणबी उत्कर्ष मंडळाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

वैभववाडी.ता,२५: शिक्षण असो अथवा अन्य कोणतेही क्षेत्र त्यात यशस्वी होण्यासाठी सुरूवातीपासूनच पाया भक्कम ठेवा. स्वप्ने मोठी पाहा आणि ते पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनत हे गुण आत्मसात करत वाटचाल करा. असे प्रतिपादन भाजपा नेते संदेश पारकर यांनी व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्हा कुणबी उत्कर्ष मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच ५ वा वर्धापनदिन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार रमेश जोगळे, जि. प. सदस्या पल्लवी झिमाळ, प. स. सदस्या अक्षता डाफळे, समाज जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भोवड, खजिनदार भाई नराम, संघटना संस्थापक विजय डोंगरे, तालुकाध्यक्ष दीपक पाचकुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पारकर म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुणबी समाजाची मोठी ताकद आहे. त्याच बरोबरीने सिंधुदुर्गात सुद्धा मोठ्या संख्येने आहे. कोणीतरी समाजाला आधार व मदतीचा हात देण्याची वाट पाहू नका. समाजाला मी विकासाच्या दृष्टीनेही आपुलकीची भावना प्रत्येकाने मनामध्ये जपली पाहिजे. समाज संख्या महत्वाची नाही तर, विकासात्मक कार्य महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचा परिपूर्ण वापर करुन घ्या असे. आवाहन यावेळी त्यांनी केले.
पुढे बोलताना जोगळे म्हणाले, जगाचा पोशिंदा म्हणून कुणबी समाजाकडे पाहिले जाते. परिस्थितीचा विचार न करता प्रयत्न करत रहा नक्कीच यश मिळेल. यावेळी उपस्थित समाज बांधवांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप व गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पाष्टे यांनी केले.

फोटो- गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भाजपा नेते संदेश पारकर व इतर मान्यवर.

0

4