भुईबावडा तळीवाडी येथील ग्रामस्थांचे ३० रोजी आमरण उपोषण

2

वैभववाडी.ता,२५: प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे भुईबावडा तळीवाडी येथील ग्रामस्थ शासकीय पायवाटेपासून दहा ते पंधरा वर्ष वंचीत आहेत. बंद असलेली पायवाट तात्काळ खुली करण्यात यावी. या मागणीसाठी तळीवाडी ग्रामस्थ कुटुंबासहीत शुक्रवार दि. ३० ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसिल कार्यालयाला दिले आहे.
तळीवाडी ग्रामस्थांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही याविषयासंदर्भात निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. ग्रामपंचायत मालकीची सदर पायवाट असताना ती खुली करण्यात शासन असमर्थता दाखवत आहे. सद्यास्थिती जीव मुठीत घेवून अडचणीतून वाडीकडे प्रवास करावा लागत आहे. भूमी अभिलेखने ही पायवाट पारंपरिक असल्याचे पत्र दिले आहे. गाव नकाशात तशी नोंदही आहे. तहसिलदारांनी सदर वाट खुली करावी असे आदेशही दिले आहेत. परंतु वाडीतील काही ग्रामस्थांनी वाटेबाबत हरकत करून मनाई आदेश घेतला आहे. सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई संबंधित प्रशासन करु शकते. परंतु ते करत नाही असे निवेदनात म्हटले आहे.
तळीवाडी ग्रामस्थ पायवाट मिळावी यासाठी आर या पारच्या लढाईला सज्ज झाले आहेत. पायवाट खुली झाल्याखेरीज आमरण उपोषण सोडणार नाही. असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनात तळीवाडी विकास मंडळ मुंबई अध्यक्ष हरि मोरे, सचिव प्रकाश चव्हाण, खजिनदार प्रकाश साळुंखे यांनी स्वाक्षरी केली आहे.

0

4