दहावी-बारावीत चमकणारी सिंधुदुर्गची मुले स्पर्धा परीक्षात मागे का…?

206
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सुहास सावंत: मराठा समाजाच्या कार्यक्रमात व्यक्त केली खंत…

सावंतवाडी.ता,२५: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे. मात्र ती दहावी-बारावीनंतर स्पर्धा परीक्षा पर्यंत टिकत नाही अशी खंत सिंधुदुर्ग मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक ॲड सुहास सावंत यांनी केेली.
सावंतवाडी येथे राणी पार्वतीदेवी हायस्कूल सभागृहात मराठा समाजातील दहावी शालांत परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थी – विद्यार्थीनींचा गुणगौरव समारंभ आयोजित केला होता.
यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले, भोसले नॉलेज सिटीचे अध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, सावंतवाडी मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे, नगरसेवक खेमराज कुडतरकर, प्रा. रुपेश पाटील, डॉ. नेत्रा सावंत, प्रशांत कोठावळे, अभिमन्यू लोंढे, सौ. अपर्णा कोठावळे आदी उपस्थित होते.
यावेळी अॅड. सावंत म्हणाले, मराठा समाज संघटीत होण्यासाठी कोपर्डीच्या ताईने आपले बलिदान दिले. त्यानंतर हा समाज खऱ्या अर्थाने पेटून उठला. मराठा समाजाच्या गेली कित्येक वर्षांच्या असलेल्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्यावर्षी १६ ऑगस्टला निकराची लढाई लढावी लागली. सिंधुदुर्गातील साडेचार लाख मराठा समाज बांधवांनी भव्य मोर्चा काढला आणि आपली ताकद दाखवून दिली. त्यानंतर राज्यसरकारने मराठा आरक्षण संमत्त केले. या आरक्षणाचा फायदा आज कित्येक गोरगरीब, उच्चशिक्षित समाजातील उमेदवारांना होत आहे. आता सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण आले आहे. त्यामुळे यावरच समाधानी न राहता मराठा समाजाने आपल्या समोर उभे राहिलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे.येथील मुलांमध्ये चांगली गुणवत्ता आहे. मात्र स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना म्हणावे तसे यश मिळत नाही. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत आपण सर्वांनी ठोस पावले उचलली पाहिजेत. ती काळाची गरज आहे. लातूर, मराठवाडा, विदर्भातील मुले त्यांच्या मेहनतीने, परिश्रमाने स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवितात. परंतु, आपल्या समाजातील मुलांमध्ये परीक्षांबाबत मानसिकतेमध्ये फरक जाणवत असल्यामुळे त्यांना यश मिळत नाही. मुलांच्या अनावश्यक वस्तूंवर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा त्या पैशातून मुलांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनची पुस्तके घेऊन दिल्यास त्यांचे कल्याण होईल. मुलांचे भवितव्य घडवायचे असेल तर मराठा समाजातील मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक उपक्रम घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे शैक्षणिक क्रांतीसाठी आपण लढलं पाहिजे असे यावेळी ते म्हणाले.
राजेसाहेब खेमसावंत भोसले यांनी कोकणातील मुलांमध्ये बौद्विक क्षमता आहे. मात्र, योग्य मार्गदर्शन आणि मानसिकतेमुळे आपण मागे पडत आहोत. परंतु, मुलांनी अपयशाची भिती न बाळगता त्या अनुभवातून पुढे शिकत जाऊन यश मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मोठमोठे शास्त्रज्ञ यांनाही अपयश आले होते. मात्र त्यातूनच त्यांनी जगविख्यात वैज्ञानिक शोध लावून क्रांती घडवून आणली. मराठा समाज हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा समाज आहे. त्यामुळे देशाला पुढे न्यायचे कर्तव्य या समाजाने करावे असे त्यांनी सांगितले.
भोसले नॉलेज सिटीचे अध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांनी ज्याप्रमाणे येथील मुले दहावी – बारावीमध्ये झोकून देऊन अभ्यास करतात तशाचप्रकारचा प्रयत्न त्यांनी स्पर्धा परीक्षांमध्येही करावा. आपणास कोणत्या क्षेत्रात करीअर करावयाचे आहे याचे चिंतन मुलांनी केलं पाहिजे. आपले ध्येय निश्चित करुन स्पर्धा परीक्षांकडे लक्ष दिल्यास त्या हमखास यश मिळेल असे ते म्हणाले.
यावेळी ७५ टक्के गुण मिळविणाऱ्या दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात प्रा. रुपेश पाटील यांनी मुलांना स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केले.

\