सावंतवाडी ता.२६: तेंडोली,केळूस,आंदुर्ले पंचक्रोशीतील बीएसएनएलच्या थकबाकीमुळे वर्षभरापासून बंद असलेल्या जीटीएल कंपनीचा टॉवर तात्काळ सुरु करा,या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी आज सकाळपासून बीएसएनएल कार्यालय समोर उपोषण सुरु केले आहे.जोपर्यंत याठिकाणी प्रस्तावित असलेल्या बीएसएनएलच्या टॉवरचे काम पूर्ण होत नाही,तोपर्यंत थकबाकी देऊन जीटीएल कंपनीचा टॉवर कार्यान्वित करून द्यावा,अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.दरम्यान माजी आमदार तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी भेट देऊन प्रशासकीय स्तरावर आवश्यक असलेली मदत करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले.
गेल्या वर्षभरापासून या भागात कोणत्याच कंपनीची रेंज उपलब्ध नसल्यामुळे येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.या परिसरात बीएसएनएल कंपनीचा टॉवर प्रस्तावित आहे.मात्र टॉवरचे काम पूर्ण होण्यासाठी चार ते पाच महिन्याचा कालावधी जाणार आहे.तोपर्यंत नागरिकांची होणारी गैरसोय दुर करण्यासाठी जीटीएल कंपनीचा टॉवरची थकबाकी पूर्ण करून हा प्रश्न तात्पुरता सोडवावा अशी मागणी यावेळी उपस्थित ग्रामस्थांकडून करण्यात आली.या भागात रेंज उपलब्ध नसल्याने नुकत्याच आलेल्या पूरस्थिती येथील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे शासकीय तसेच वैद्यकीय सुविधा काही नागरिकांपर्यंत अद्याप पर्यंत पोहोचू शकला नाही त्यामुळे सद्यस्थिती हा प्रश्न तात्काळ मार्गी लागणे गरजेचे आहे असेही उपस्थित मधून सांगण्यात आले.
यावेळी संजय वेंगुर्लेकर, तेडोंली सरपंच मंगेश प्रभू,तेडोंली उपसरपंच आबा खवणेकर,सौ.आरती पाटील,मनोहर राऊळ, ज्ञानेश्वर तांडेल,अक्षय तेंडोलकर सौ.प्रमोदिनी मेस्त्री,धोंडू मुणगेकर,मंगेश सर्वेकर, सौ.मिनाक्षी नागडे, महेश राऊळ , नागेश आरोलकर,संदिप तांडेल आदी ग्रामस्थ उपस्थित होते.