गणेशोत्सवासह विविध सणाना होणार फायदा लाभ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी.ता,२६: सणासुदिला घरातील महिलांच्या हाती पैसा असावा. बचत गटाच्या महिलांची आर्थिक गरज पूर्ण व्हावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी या सणांसाठी ‘माउली बचतगट खावटी कर्ज योजना’ खास बचतगटांच्या सदस्यांसाठी सुरु केली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.
स्वयंसहायता बचत गटातील सभासदांना त्यांच्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी जिल्हा बँकेकडून कर्ज पुरवठा केला जातो. गटांना तात्काळ कर्ज मिळण्यासाठी रुपये तीन लाख पर्यंतचे कर्ज वितरणाचे अधिकार शाखांना देण्यात आले आहेत. सणासुदीच्या काळात महिलांना त्यांच्या कौटुंबिक कारणासाठी पैशाची आवश्यकता भासते. शेतकऱ्यांना विकास संस्थान मार्फत खावटी कर्ज बँकेकडून उपलब्ध करून दिले जाते. परंतु बचत गटातील महिलांना अशा प्रकारचे कर्ज उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना खावटी कर्ज उपलब्ध करून देण्याचा जिल्हा बँकेने निर्णय घेतला आहे.
बचत गटातील महिलांच्या गरजा या कमी रकमेच्या मात्र नियमित स्वरूपाच्या असतात. विशेषतः सणासुदीच्या काळात पैशाची आवश्यकता अधिक असते, कोकणात गणेश चतुर्थी हा सर्वात मोठा सण असतो .अशावेळी सर्वसामान्य महिलांची पैशाची गरज भागविण्याकरिता बँकेमार्फत गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी आधी सणांसाठी गटातील सभासदांना प्रती सभासद रुपये चार हजार प्रमाणे कमी व्याजदराने खावटी कर्ज देण्यात येणार आहे. ही योजना १६ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली असून दिवाळीच्या ( बलिप्रतिपदा) पुढे १५ दिवस कार्यान्वीत राहणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गटातील महिलांनी जिल्हा बँकेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधून आपल्या गटाचा प्रस्ताव बँकेकडे सादर करावा, असे आवाहन सतीश सावंत यांनी केले आहे.



