सावंतवाडी ता.२६: माजगाव मेटवाडा येथील ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायतीच्या समोर पाण्यासाठी उपोषण केले.वारंवार पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने त्याकडे लक्ष न दिल्याने आपण हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले जोपर्यंत आपल्याला योग्य ते उत्तर दिले जात नाही,तोपर्यंत माघार घेणार नाही,असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.
यावेळी या उपोषणाला माजी आमदार तथा भाजपाचे नेते राजन तेली यांनी भेट देऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.दरम्यान त्यांनी नगरपालिकेशी संपर्क साधला असता पूर्ण पाईपलाईन जीर्ण झाल्याचे सांगण्यात आले.यावेळी नगरपालिका व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करू,असे आश्वासन श्री.तेली यांनी ग्रामस्थांना दिले.
मार्च महिन्यापासून या भागातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.येथील ८५ घरांना एक लाख लिटर पाणीपुरवठा यापूर्वी होत होता.मात्र सद्यस्थितीत एका घराला दोनशे लिटर सुद्धा पाणी मिळत नाही.तसेच या परिसरात बांधण्यात आलेल्या सार्वजनिक विहिरीवर शेती पंप तसेच खाजगी पंप बसविण्यात आल्याने विहिरीच्या पाण्याची पातळी सुद्धा जलद गतीने खालावत आहे.याबाबत संबंधितांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे येत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.
यावेळी सद्गुरु भोगणे,सचिन मोरजकार, प्रशांत मोरजकार, उमेश सावंत,पवन सावंत,विजय सावंत,सौरभ पडते,प्रसाद सावंत,अभिजीत सावंत,बाळ राठोड,मयुरेश पावसकर,गितेश प्रभावळकर,गोविंद माळकर,कृष्णाजी सावंत,भारती सावंत,दिपाली सावंत,श्रीया सावंत,गीतांजली सावंत,मृण्मयी सावंत,सेजल माळकर,लक्ष्मण परब,निखिल मोरजकर,शिवराम नाटेकर,प्रतीक सावंत,वसंत सावंत,दत्तराज सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.