सावंतवाडी पालिका बैठकीत नगरसेवकांचा व्यापारी संघटनेच्या पदाधिका-यांना इशारा…
सावंतवाडी ता.२६: नगरसेवक पैसे घेतात असे सांगून सावंतवाडीतील नगरसेवकांची कोणी बदनामी करत असेल तर, ते चुकीचे आहे.अशाप्रकारे आरोप करणाऱ्या व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पालिकेत येवून कोणाचे ते नाव जाहीर करावे,अन्यथा नगरसेवकांची माफी मागावी.अशी मागणी आज येथे आयोजित पालिकेच्या बैठकीत उपस्थित सर्व नगरसेवकांनी केली
व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर बसणार्या फिरत्या विक्रेत्याकडुन नगरसेवक पैसे घेतात असा आरोप नगराध्यक्षासमाेर केले होता.यावर आज चर्चा झाली.असा आरोप सभागृहाचा अवमान करणारा आहे.व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत जाहीर माफी मागावी अन्यथा त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी,तसेच निषेधाचा ठराव घ्यावा अशी मागणी नगरसेवकांनी केली.
व्यापारी संघाचे जे कोण पदाधिकारी नगराध्यक्षांना भेटले त्यांनी सभागृहात हजर राहावे व पैसे घेणार्या नगरसेवकांचे नाव घेऊन बोलावे,अशी मागणी नगरसेवक नासिर शेख यांनी यावेळी केली.त्यावर आनाराेजीन लाेबाे,सुरेंद्र बांदेकर व अन्य नगरसेवकांनी आवाज दिला.आयत्या वेळच्या विषयात नगरसेवक शेख यांनी नगरसेवकावर पैसे घेण्याच्या आरोपाबाबत प्रश्न उपस्थित केला.याबाबत संबंधित व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर निषेध केला.यावेळी ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी नगरसेवकावर होणारे आरोप निषेधार्थ असून नगरपालिकेतील एकही नगरसेवक कोणाच्या चहाला सुद्धा नाही,त्यामुळे ज्यांनी आरोप केले,त्या संबंधितांनी सभागृहात येऊन याबाबत खुलासा करावा,अन्यथा जाहीर माफी मागावी अशी मागणी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या जवळ केली.
या बैठकीला शहरातील विविध विकास कामावर चर्चा होताना भाट यांनी नवीन इमारतीच्या ट्रांसफार्मर बसविण्याबाबत रस्ते खोदाई करण्यासाठी पालिकेकडे मागितलेल्या परवानगी वर नगरसेवक शेख यांनी आक्षेप घेतला.त्यांनी इमारतीला पार्किंगसाठी दाखविलेल्या जागेवर परवानगी मिळताच शॉप घालून ते विक्रीस काढले असा आरोप केला.त्यामुळे याबाबत अधिक चौकशी व्हावी आणि नंतरच त्यांना परवानगी द्यावी असे सांगितले यावर चौकशी करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिले.
बैठकीत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीला शहरात गॅस पाईपलाईन साठी रस्ता खोदाई करण्यास परवानगी देण्याबरोबरच अन्य विकासकामांना परवानगी देण्यात आली.