चिवला बीच किनारपट्टी झाली प्रकाशमय… टायमर चोरीमुळे किनारपट्टी होती अंधारात ; यतीन खोत यांच्या पाठपुराव्यामुळे नवीन टायमर बसविण्याची कार्यवाही…

2

मालवण, ता. २६ : शहरातील चिवला बीच येथील हायमास्ट टॉवरचा टायमर चोरीस गेल्याने गेले तीन महिने किनार्‍यावरील हायमास्ट तसेच अन्य दिवे बंदावस्थेत होते. याबाबत स्थानिक नगरसेवक यतीन खोत यांनी पालिका प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर हायमास्टला नवीन टायमर बसविण्याची कार्यवाही झाली आहे. त्यामुळे चिवला बीच किनारपट्टी पुन्हा एकदा प्रकाशमय बनली आहे.
चिवला बीच येथे बसविलेल्या हायमास्ट टॉवरचा टायमर अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना मे महिन्यात घडली होती. याप्रकरणी पालिका प्रशासनाच्यावतीने पोलिस ठाण्यात तक्रारही देण्यात आली होती. टायमर चोरीला गेल्याने चिवला बीच येथील हायमास्ट टॉवर तसेच अन्य दिवे बंद असल्याने या भागात काळोखाचे साम्राज्य पसरले होते. याप्रकरणी स्थानिक नगरसेवक यतीन खोत यांनी या प्रश्‍नी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनाही ही समस्या निदर्शनास आणून दिली.
अखेर पालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला नवा टायमर बसविण्याची सूचना केली. त्यानुसार नवीन टायमर बसविण्यात आला असून चिवला बीच किनारपट्टी पुन्हा प्रकाशमय बनली आहे. हायमास्ट टॉवर पुन्हा सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्ष कांदळगावकर, नगरसेवक खोत यांचे आभार मानले.

17

4