आचरा- कालावल मार्गावरील खड्डे स्वखर्चातून बुजविले… सामाजिक कार्यकर्ते बंड्या खोत मित्रमंडळाचा उपक्रम ; ग्रामस्थांतून समाधान…

2

मालवण, ता. २६ : आचरा-चिंदर-वायंगणी-कालावल हा मुख्य मार्ग खड्ड्यांमुळे वाहतुकीस धोकादायक बनला आहे. दुचाकींचे अपघात होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजविण्याची कार्यवाही होत नसल्याने सामाजीक कार्यकर्ते बंड्या खोत यांनी आज स्वखर्चातून हे सर्व खड्डे बुजविले.
आचरा-मालवण मार्गावर आचरा ते कालावल पूल दरम्यान खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. महिनाभरापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसात हे खड्डे आणखीनच वाढले. वयोवृद्ध तसेच महिला दुचाकीस्वारही या खड्ड्यामुळे पडले होते. त्यामुळे वाढत्या अपघाताची स्थिती लक्षात घेता कालावल खाडीपात्रातील खोतजुवा बेटावरील सामाजिक कार्यकर्ते बंड्या खोत यांनी जांभा दगड व खडीने खड्डे बुजवले. हडी-ओझर मार्गावर काही प्रमाणात असलेले खड्डेही बुजविण्यात आले.
यावेळी विलास जोशी, प्रवीण खोत, विकी सावंत, प्रमोद धुरी, प्रणय खोत, भाई गावकर, प्रदीप भोवर, हेमंत गुरव, उदय घाडी, प्रकाश कदम, योगेश भिसळे, राहुल भिसळे, पंडित खोत, जगदीश गोसावी, संतोष वायंगणकर, विनायक सावंत व अन्य मित्र परिवाराचे खोत यांना सहकार्य लाभले.
बंड्या खोत यांनी खोत जुवा बेट येथील आपल्या घरी आणलेले दगड होडीने आणले. अन्य ठिकाणाहून आणलेल्या दगड खडीचा खड्डे बुजविण्यास वापर केला. सकाळी सात वाजल्यापासून दुपारी उशिरापर्यंत खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते.

12

4