मालवण, ता. २६ : खालची देवली येथील खाडीपात्रात सध्या पहाटेच्यावेळी अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या वाळू उपशास बंदी असतानाही कोणाच्या वरदहस्ताने वाळू उपसा सुरू आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून अवैधरीत्या वाळू उपसा करणार्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
मागील वर्षी जिल्हा प्रशासनाकडून वाळू लिलाव पट्ट्यांची प्रक्रिया सहा महिने उशिराने झाल्याने लिलावधारकांना मोठा फटका बसला. त्यामुळे विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी वाळू पट्ट्यांची लिलाव प्रक्रिया करण्याची मागणी लिलावधारक, वाळू उत्खनन संस्था, डंपर चालक-मालक, शासकीय बांधकाम ठेकेदारांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
सद्यःस्थितीत वाळू उपसा करण्यास पूर्णतः बंदी आहे. मात्र खालची देवली खाडीकिनारी गेले काही दिवस पहाटेच्यावेळी वाळू माफियांकडून अवैधरीत्या वाळूचा उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मध्यरात्री अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याने शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूलही बुडत आहे. वाळू उपसा बंद असताना खाडीकिनारी क्षेत्रात वाळू उपसा करणार्या कामगारांचे वास्तव्य असल्याने अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून अचानक धाड घालून कारवाई करणे गरजेचे बनले आहे.