खड्डे बुजविण्याचे काम तारकर्ली ग्रामस्थांनी बंद पाडले… लालमातीच्या वापरावरून ग्रामस्थांचा आक्षेप…

202
2

मालवण, ता. २६ : तारकर्लीत लालमाती टाकून चुकीच्या पद्धतीने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे सुरू असलेले काम स्थानिक हॉटेल व्यावसायिक तसेच ग्रामस्थांनी बंद पाडले. जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर व सार्वजनिक बांधकामच्या अधिकार्‍यांनी रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने करण्याचे आश्‍वासन स्थानिक ग्रामस्थांना दिले. त्यानुसार उद्यापासून ग्रामस्थांनी केलेल्या सूचनेनुसार खड्डे बुजविण्याचे काम केले जाईल असे बांधकामच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.
वायरी, तारकर्ली, देवबाग येथील हॉटेल व्यावसायिक स्थानिक ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकामच्या कार्यालयात धडक देत रस्त्यावरील खड्ड्यांची तत्काळ दुरूस्ती करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार आज सकाळपासून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामास सुरवात करण्यात आली. खड्डे बुजविण्यासाठी लाल मातीचा वापर केला जात असल्याने पाऊस पडल्यास पुन्हा चिखलाचे साम्राज्य पसरणार आहे असे सांगत स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी, ग्रामस्थांनी घटनास्थळी जात काम बंद पाडले. सार्वजनिक बांधकामच्या अधिकार्‍यांना बोलावून घेत वस्तूस्थिती दाखविण्यात आली.
या प्रकाराची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांना दिली असता त्यांनी सुरवातीस उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यानंतर जेव्हा ते घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांना वस्तूस्थिती दिसून आली. बोल्डर, काळी ग्रीट रस्त्यावर पसरून त्यावर रोलिंग करावे. ज्या ठिकाणी छोटे खड्डे आहेत त्यावर डांबर टाकावे अशा सूचना ग्रामस्थांनी अधिकार्‍यांना केल्या. रस्त्यांचा सर्व्हे केल्यानंतरच नव्याने रस्ता मंजूर करावा. येत्या दिवाळीपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
यावेळी प्रफुल्ल मांजरेकर, शरद माडये, संकेत तारी, शंकर वायंगणकर, श्याम झाड, मिथिलेश मिठबावकर, शिवा माडये, प्रसाद माडये, महेंद्र चव्हाण, सुनील चव्हाण, राजू मालवणकर, रवींद्र मालवणकर, कृष्णा तळवडेकर, गजानन कुबल, सहदेव साळगावकर, नारायण माडये, राजेश गोवेकर, बाळा पेडणेकर, भूषण माडये, सचिन मातोंडकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

4