ईला फांउडेशनचा अहवाल:विलुप्तप्राय प्राण्यांचा दर्जा देण्याची मागणी
सावंतवाडी/दत्तप्रसाद पोकळे
कोकण किनारपट्टी विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुसंख्येने आढळणाऱ्या मृदुकाय पाणमांजराला(smooth coated Other) आंतरराष्ट्रीय स्तरावर परिशिष्ट एक मधील संकटग्रस्त प्रजाती म्हणून संरक्षित करण्यात आले आहे. दुर्मिळ प्राण्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवणाऱ्या “सिटीस” या संस्थेने पाणमांजराचा आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करण्यास प्रतिबंध केला आहे.ईला फौंडेशनच्या अहवालानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात 500 च्या वर पाणमांजरे आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन पाणमांजराची शिकार करून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठया प्रमाणात अवैध विक्री होत होती.आता या प्रकाराला पायबंद होणार आहे.
सध्या जिनिव्हा येथे दुर्मिळ प्राण्यांच्या अवैध व्यापारावर लक्ष ठेवणाऱ्या सिटीस या जागतिक संघटनेची परिषद सुरू आहे.या परिषदेत भारताने पाणमांजराच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रतिबंध आणण्याची मागणी केली.पाणमांजर हा भारतातून विलुप्त होण्याच्या मार्गावर असून,हा प्राणी सध्या केवळ सिंधुदुर्ग व गोवा या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येतो.या भागात त्याची मोठ्या प्रमाणात शिकार होऊन,आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची अवैद्य विक्री होत आहे.त्यामुळे पाणमांजराला विलुप्तप्राय प्राण्याचा दर्जा देऊन त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील विक्री रोखण्यास यावी, अशी मागणी भारताने केली.भारताच्या या मागणीच्या बाजूने 102 देशांनी मतदान केले तर 15 देशांनी विरोधात मतदान केले.भारताची मागणी मान्य करत ‘सिटीस’ने मृदुकाय पाणमांजराला(smooth coated Other) आंतरराष्ट्रीय स्तरावर परिशिष्ट एक मधील संकटग्रस्त प्रजाती म्हणून संरक्षित केल्याचे जाहीर केले.
मृदुकाय पाणमांजर(smooth coated Other) सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठया संख्येने दिसून येतो.इला फाउंडेशन आणि मॅनग्रोव्ह सेलच्या अभ्यासानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12 खाडी व तलावात सुमारे 500च्या पाण मांजरांचे अधिवास आहेत.सध्या या संस्थेकडून चालू असलेल्या अभ्यासानुसार, दक्षिण रत्नागिरीच्या सर्व खाड्यांमध्येही पाणमांजराला उपस्थिती आढळली आहे.मॅंग्रोव्ह सेलचे अतिरिक्त मुख्य वन संरक्षक एन. वासुदेवन यांनी सांगितले की, ओटर्समधील आंतरराष्ट्रीय व्यापाराची नोंद अलीकडे झाली नसली तरी खाडीच्या आतील उंचवट आणि औद्योगिक वायू प्रदूषणासारख्या घटकांनी पाण मांजरांच्या अधीवासस्थानास धोका निर्माण केला आहे.पाणमांजराशिवाय इंडियन स्टार कासवालाही आंतरराष्ट्रीय स्तरावर परिशिष्ट एक मधील संकटग्रस्त प्रजाती म्हणून संरक्षित करण्यात आले आहे.