आझाद मैदान मुंबई येथे आंदोलनकर्त्या शिक्षकांना केलेल्या लाठीहल्ल्याचा शिक्षक समितीकडून निषेध

2

सिंधुदुर्गनगरी.ता,२७: विनाअनुदानित शाळांना अनुदानित शाळा म्हणून मान्यता देण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या शिक्षक बांधवांवर केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे.
गेले काही दिवस विनाअनुदानित शाळांना अनुदान दयावे या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे समस्याग्रस्त शिक्षकांनी धरणे धरले होते.मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या मागण्या सरकार मान्य करेल अशी आशा त्यांना होती.परंतु मंत्रीमंडळ बैठकीत यावर चर्चाच न झाल्याचे समजताच आंदोलनकर्ते शिक्षक संतप्त झाले.त्यांनी पोलिसांना मुख्यमंत्री यांची भेट द्यावी अशी मागणी केली.पोलिसांनी ती मागणी धुडकावून लावताच गदारोळ झाला.यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करुन शिक्षकांना अमानुष मारहाण केली.त्यात अनेक शिक्षक जबर जखमी झाले.ही दुर्दैवी घटना असून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आंदोलनकर्त्या शिक्षकांच्या न्यायोचित मागणीस पाठिंबा व्यक्त करीत असून शासकीय यंत्रणेच्या उदासीन व उद्दाम भूमिकेची तीव्र निर्भत्सना करीत आहे.अशा शब्दात जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे व जिल्हासरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी निषेध व्यक्त केला आहे.

16

4