रविंद्र जठार:नडगिवे अपूर्ण शाळेचा विषय बांधकाम समिती सभेत गाजला…
सिंधुदुर्गनगरी.ता,२७: कणकवली उपअभियंता यांनी १५ ऑगस्ट रोजी नडगिवे शाळा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र,२७ ऑगस्ट आला तरी हे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे बांधकाम समिती सभेत हा विषय लावून धरित बांधकाम विभागाला धारेवर धरले. यावेळी त्यांनी पुढच्या महिनाभरात या शाळेचे काम पूर्ण न झाल्यास आम्ही सत्ताधारी असलेल्या जिल्हा परिषदेचे प्रशासन आहोत, याचा विचार करणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने जाब वीचारु, असा इशारा दिला.
जिल्हा परिषदेच्या नाथ पै सभागृहात सभापती जेरॉन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी संपन्न झालेल्या या सभेला प्रभारी कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, सदस्य रविंद्र जठार, राजू कविटकर, रेश्मा सावंत यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विहित मुदत संपुनही अर्धवट स्थितीत असलेल्या नडगिवे प्राथमिक शाळा व खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचा विषय चांगलाच गाजला. यावेळी प्रशासनाने लवकरात लवकर या दोन्ही इमारती पूर्ण करून घेण्याचे आश्वासित केले. यावेळी रेश्मा सावंत यांनी बांधकाम विभागाने जिल्हा परिषद उत्पन्न वाढीच्या दृष्टीने काय प्रयत्न केले ? असा प्रश्न केला. मात्र, बांधकाम विभाग समर्पक उत्तर देवू शकले नाही. यावेळी जिल्हा परिषद आवारातील नारळ झाडांचा लिलाव झाला का ? असाही प्रश्न करण्यात आला. लिलाव करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उत्पादन कोण खातो ? असा खोचक प्रश्नही करण्यात आला.