भुईबावडा घाट आजपासून वाहतूकीस सुरळीत!

157
2
Google search engine
Google search engine

 

वैभववाडी/पंकज मोरे

तालुक्यात तीन आठवड्यांपूर्वी जोरदार झालेल्या अतिवृष्टीचा फटका घाट मार्गांना बसला. या झालेल्या अतिवृष्टीत भुईबावडा घाटात रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठया भेगा पडल्या होत्या. या मार्गावरून प्रवास करणे जीवघेणा ठरत होते. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने याठिकाणी तात्पुरती डागडुजी करून एकेरी वाहतूक सुरू केली आहे. दरम्यान मंगळवारी दुपारी सा. बां. ने गगनबावडा आगाराला एस. टी. चालू करण्यात यावी. असे लेखी पत्राव्दारे कळविले आहे. त्यानुसार गगनबावडा आगाराने तात्काळ एस. टी. बस सुरू केली आहे. त्यामुळे भुईबावडा दशक्रोशीतील प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
यावर्षी पावसाने अक्षरशः थैमान घातल्याने भुईबावडा घाटात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. भुईबावडा-रिंगेवाडी पासून सुमारे चार ते पाच कि. मी. अंतरावर रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या भेगा पडल्या होत्या. याठिकाणी ‘भूस्खलन’ होण्याची दाट शक्यताही जाणकारांकडून वर्तविली जात होती.
दरम्यान गगनबावडा-खारेपाटण राज्यमार्गावरील वाहतूक करुळ घाट मार्गे वळविण्यात आली होती. अवजड वाहनांना या मार्गावरून वाहतूक करण्यास बंदी होती. तशा प्रकारचे सा. बां. ने उंबर्डे व रिंगेवाडी येथे बॕरिकेट्स लावले होते. मात्र अवजड वाहन चालक स्वतः चा जीव धोक्यात घालून वाहतूक करीत होते. दरम्यान सा. बां. ने भेगा पडल्या त्याठिकाणी तात्पुरती डागडुजी करुन वाहतूक एकेरी सुरू केली आहे.
जोपर्यंत भुईबावडा घाट सुरळीत होत नाही तोपर्यंत एस. टी. बस सोडू नये. असे आदेश गगनबावडा तहसिलदार यांनी आगार व्यवस्थापकांना दिले होते. त्यानुसार त्यांनी एस. टी. न चालविण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी दुपारी सा. बां. ने घाट मार्ग सुरळीत आहे. एस. टी. बस सोडण्यात यावी. असे लेखी पत्राव्दारे गगनबावडा आगाराला कळविले. त्यानुसार तात्काळ कार्यवाही करून आजपासून भुईबावडा घाटातून एस. टी. बसेस सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे भुईबावडा दशक्रोशितील प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

_गगनबावडा आगाराने तात्काळ कार्यवाही केली_

याबाबत दूरध्वनीवरून गगनबावडा आगाराचे व्यवस्थापक श्री. व्ही. एस. बुवा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, सार्वजनिक बांधकाम वैभववाडी यांनी एस. टी. सुरू करण्याबाबत पत्र दिले आहे. त्यानुसार आम्ही तात्काळ एस. टी. बस सुरू करीत असल्याचे सांगितले.

_भुईबावडा घाटाची तात्पुरती डागडुजी_

भुईबावडा घाटात रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्याठिकाणी तात्काळ डागडुजी करून एकेरी वाहतूक सुरू केली आहे. या मार्गावरून एस. टी. वाहतूक सुरू करण्यासाठी गगनबावडा आगाराला लेखी पत्र दिले असल्याचे बांधकाम कडून सांगण्यात आले आहे.