आम. पावसकर, उपरकरांचा इशारा ; पालकमंत्र्यांकडून जिल्हावासीयांची फसवणूक…
चिपी, ता. २७ : चिपी विमानतळावर गणेश चतुर्थीला पालकमंत्री जर अनधिकृतरीत्या विमान उतरवीत असतील तर आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण पावसकर, मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज येथे दिला. विमानतळाचे उद्घाटन करून पालकमंत्र्यांनी जिल्हावासियांची घोर फसवणूक केली आहे त्यामुळे सर्वपक्षीयांनी एकत्रित येत आंदोलन छेडण्याची वेळ आली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
चिपी विमानतळाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले. मात्र अद्यापही या विमानतळावरून विमानसेवा सुरू झालेली नाही. पालकमंत्र्यांनी येत्या गणेश चतुर्थीला विमानसेवा सुरू होईल असे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण पावसकर, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी चिपी विमानतळास भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीस जबाबदार अधिकारी नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी आवश्यक परवानग्या वीज पुरवठा, पाणी, प्रकल्प मुदत तसेच अन्य समस्यांची माहिती घेण्यात आली. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने निवेदन देत एका महिन्यानंतर पुन्हा धडक देऊ असा इशारा श्री. पावसकर, श्री. उपरकर यांनी दिला.
श्री. उपरकर म्हणाले, पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचा विकास दहा वर्षे मागे नेला. चिपी विमानतळाच्या विषयासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेने धडक दिली. मात्र कोणतीही माहिती मिळू नये. जिल्ह्यातील जनतेसमोर पितळ उघडे पडू नये यासाठी प्रकल्प अधिकार्यांना येथे न थांबण्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. मात्र आमच्याकडे चिपी विमानतळाबाबतची सर्व माहिती उपलब्ध आहे. गेल्यावेळी पालकमंत्र्यांनी येथे अनधिकृतरीत्या विमान उतरविले. जिल्ह्यातील जनतेला फसविण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांनी किती घोषणा केल्या आणि किती पूर्ण केल्या याची माहिती देण्यासाठी जनतेसमोर, विरोधी पक्षासमोर यावे असे आव्हान श्री. उपरकर यांनी दिले.
श्री. पावसकर म्हणाले, लोकसभा निवडणूकीत मते मिळविण्यासाठी चिपी विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. प्रत्यक्षात उद्घाटनानंतर इमारत कोणाच्याही ताब्यात दिली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पालकमंत्र्यांनी पुन्हा एकदा गणेश चतुर्थीला विमान उतरविणार असल्याचे सांगितले आहे. मात्र कोणत्याही परवानगी न घेता केवळ गणेश चतुर्थीलाच आणि अनधिकृतपणे विमान उतरवीत असतील तर आम्हाला न्यायालयाचे दार ठोठवावे लागेल असा इशारा श्री. पावसकर श्री. उपरकर यांनी यावेळी दिला.