पूरग्रस्तांसाठीचा धनादेश तहसीलदांना सुपुर्द…
मालवण, ता. २७ : गिलनेट, रापण आणि ट्रॉलर व्यावसायिक मच्छीमारांकडून होत असलेल्या मत्स्यदुष्काळाच्या मागणीला मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीने पाठिंबा दर्शविला आहे. मत्स्यदुष्काळ जाहीर होण्यासाठी शक्य तेवढे सहकार्य मच्छीमारांना केले जाईल, असे तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर यांनी सांगितले.
एलईडी दिव्यांच्या प्रखर प्रकाशाचा गैरवापर करून बेकायदेशीररित्या केली जाणारी पर्ससीन मासेमारी, परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी तसेच अनधिकृत पर्ससीनद्वारे होणारी अतोनात मासेमारी यामुळे रापण, गिलनेटधारक पारंपरिक मच्छीमारांबरोबरच ट्रॉलर व्यावसायिक मच्छीमारांना मत्स्यदुष्काळाची समस्या भेडसावत आहे. त्यांचे आर्थिक उत्पन्न प्रचंड घटले आहे. गेले वर्षभर हे मत्स्यदुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. या संकटाची छाया दिवसेंदिवस गडद होत चालली आहे. तरी शासनाने पारंपरिक मच्छीमारांकडून होत असलेल्या मागणीचा गंभीरपणे विचार करावा. मत्स्यदुष्काळाचे निकष बदलून मत्स्यदुष्काळ जाहीर करावा, या मागणीस मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीने पाठिंबा दर्शविला आहे.
नारळी पोर्णिमा उत्सवाचे औचित्य साधत मालवण तालुका गाबित समाजाच्यावतीने बंदर जेटी येथे पूरग्रस्तांकरिता निधी गोळा करण्यासाठी दानपेटी उपक्रम राबविण्यात आला होता. ह्या उपक्रमातंर्गत गोळा झालेला १५ हजार २२५ रूपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता डिमांड ड्राफ्टद्वारे तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, सचिव महेंद्र पराडकर, सदस्य दादा वाघ, अरविंद मोंडकर, भाऊ मोरजे, सहदेव साळगावकर, नरेश हुले, संतोष ढोके, सल्लागार महेश जुवाटकर आदी उपस्थित होते.