न्याय्य मागण्यांसाठी महसुल कर्मचारी सामुदायिक रजेवर

182
2
Google search engine
Google search engine

धरणे आंदोलनाने वेधले लक्ष;६०० कर्मचारी साहभागी…

सिंधुदुर्गनगरी.ता,२८: आपल्या न्याय मागण्यांसाठी आज महसूल कर्मचाऱ्यांनी सामुदायिक रजा टाकून जिल्ह्यात धरणे आंदोलन छेडले. सामुदायिक रजा आंदोलनात ६०० महसूल अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.
शासनासोबत झालेल्‍या बैठकामध्‍ये शासनाने तत्‍वत: मान्‍य केलेल्‍या मागण्‍यास सहा वर्षाचा कालावधी होवुनही शासनाकडुन अद्यापपर्यंत कोणताही शासन निर्णय निर्गमित न झाल्‍याने आता महसुल कर्मचाऱ्यांनी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून यापुर्वीचे चार टप्‍प्‍यातील आंदोलन यशस्‍वीपणे पुर्ण केले आहे. मात्र दरम्यानच्या कालावधीत राज्यात पुरस्थिति निर्माण झाल्याने आणि पुरगस्‍तांचे पुनर्वसन, स्‍थलांतर, आपद्ग्रस्‍तांना मदतीचे वाटप, पंचनामे आदि बहुतांश कामे महसुल अधिकारी कर्मचारी यांना करणे आवश्‍यक असल्‍याने १६ ऑगस्ट २०१९ रोजीचे लेखणीबंद आदोलन रद्द केले होते. ही कामे संपत आल्याने पुढील टप्‍प्‍यातील आंदोलन करण्याचे राज्य महसूल संघटनेने निश्‍चीत केले असून आज राज्यभर महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी सामुदायिक रजा टाकत आंदोलन केले. या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलही महसूल अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत. या सामुदायिक रजा आंदोलनात जिल्ह्यातील ६०० अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा महसूल अधिकारी कर्मचारी संघटनेने आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून आपल्या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा महसूल अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष खारात, सत्‍यवान माळवे, परमेश्‍वर फड, उमेश काळे, अशोक पोळ, सुनिल चव्हाण यांच्यासह १५० कर्मचारी उपस्थित होते.
३१ ऑगस्ट रोजी निषेध आंदोलन
आज सामुदायिक रजा आंदोलन केल्याणनंतर आता ३१ ऑगस्ट २०१९ रोजी महसूल कर्मचारी एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहेत. दिवशी कर्मचारी रक्‍तदान करुन शासनाचा निषेध करणार आहेत. तर ५ सप्टेंबर पासुन पुढे बेमुदत संपावर जाणार आहेत.