नितेश राणे ; तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न…
कणकवली, ता.२८ : राजकीय क्षेत्रात काम करताना पत्रकारांकडुन शिकायला मिळते़ ज्यांना राजकारणात भविष्य घडवायचे आहे त्यांनी नेहमी पत्रकारांशी सुसंवाद ठेवायलाच हवा.परखड लिखान करून पत्रकारांनी अन्यायाविरूद्ध लढा उभारण्याचे काम केले आहे़ गेल्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात आपल्याला पत्रकारांनी चांगला संवाद ठेवतानाच काही मुद्यांवर निर्भिडपणे पत्रकारीता केली़ कणकवलीतील पत्रकारांनी महामार्ग चौपदरीकरणाच्या मुद्यावर आवाज उठविला़ त्यातून निर्माण झालेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्रात माझ्यावर मिडीयामधून टिका झाली़ त्यावेळी कणकवलीतील आणि जिल्ह्यातील पत्रकारांनी जनतेच्या हितासाठी केलेल्या आंदोलनाचे समर्थन केले़ त्यामुळे कणकवलीतील पत्रकारांचा प्रामाणिकपणा आणि निर्भिड पत्रकारिता कायम असल्याचे गौरवोद्गार आ़ नितेश राणे यांनी काढले़.
कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात पार पाडला़ यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, नगराध्यक्ष समीर नलावडे, मराठी पत्रकार परीषदेचे राष्टÑीय अध्यक्ष गजानन नाईक, कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेश कामत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष दादा कुडतरकर, डॉ विद्याधर तायशेटये, ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, रजनीश राणे, अशोक करंबेळकर, महेश सरनाईक, पत्रकार संघाचे कणकवली तालुकाध्यक्ष भगवान लोके, लक्ष्मीकांत भावे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळयामध्ये मान्यवरांच्या हस्ते आदर्श उद्योजक पुरस्कार – दिनेश नारकर (फोंडाघाट), आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार – सुरेश उर्फ भाऊ रांबाडे (बावशी), दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार – सतिश साळगांवकर, शशी तायशेटे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार – तुषार सावंत, अनिल सावंत उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कार – उत्तम सावंत, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार – अनिकेत उचले, क्रिएटीव्ह रिपोर्टर पुरस्कार – महेश सावंत आदींना बहाल करण्यात आला. शाल व श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
आ़ नितेश राणे म्हणाले, कणकवलीतील चिखलफेक आंदोलनाचे यश हे खºया अर्थाने पत्रकारांचे आहे. राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांमध्ये या आंदोलनाचे वेगळेच चित्र रंगवले जात असताना येथे नेमके काय झाले, हे ठामपणे सांगणारे येथील पत्रकार होते. कणकवली तील पत्रकारांनी आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. पत्रकार हा माझा मित्र असला म्हणून त्याने माझ्या विरोधात काही लिहू नये अशी मी कधीही अपेक्षा ठेवली नाही. वृत्तपत्राशी बांधील राहून त्यांनी छापलेल्या बातम्यांचा मी नेहमीच आदर करतो. पत्रकार संघाने पुरस्कारासाठी व्यक्तींची केलेली निवड योग्य असल्याचे समाधान वाटते़ राजकारणी आणि जनता यांच्यात संवाद टिकुन रहाण्यासाठी पत्रकारांनी हातभार लावला पाहीजे. मराठी पत्रकार परीषदेचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा बहुमान गजानन नाईक यांच्या रूपाने कोकणला मिळाला याचा सार्थ अभिमान वाटतो़
सुरेश कामत म्हणाले, कणकवलीतील पत्रकार धडाकेबाज आहेत़ एक आदर्शवत पत्रकारीता होत आहे़ संघटनात्मक कामातही सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे काम पत्रकार करत आहेत़ त्याबद्दल मला सार्थ अभिमान वाटतो़
जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, राजकारणात विरोधकांचे कितीही हेवेदावे असले तरी त्यांना एकत्रीत आणण्याची ताकद पत्रकारांमध्ये आहे. या व्यासपिठावर आमचे जुने मार्गदर्शक परशुराम उपरकर हे कित्येक वर्षांनी एकाच व्यासपिठावर आले आहेत़ पुढील काळात सिंधुदुर्गातील रोजगारांच्या मुद्यावर जिल्हा पत्रकार संघाने सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणावे़ त्यांच्या रोजगाराच्या भूमिका समजून घ्याव्यात़ पत्रकार संघाने जिल्हा बँकेला सहप्रायोजक स्विकारण्याची संधी दिली त्याबद्दल ऋण व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले़
मराठी पत्रकार परीषदेचे राष्टÑीय अध्यक्ष गजानन नाईक म्हणाले, पत्रकांरांसदर्भात शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याबाबत खंत आहे़ पत्रकारांच्या वेतना संदर्भात शासनाने निर्णय घेतले. परंतू पत्रकारांना पुरेसे वेतन मिळत नाही. वृद्धपकाळात पत्रकारांना औषोधोपचारासाठी आर्थिक अडचणी येत आहेत़ त्याचबरोबर पत्रकारांच्या संरक्षणासाठी पत्रकार संरक्षण कायदा असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही़
परशुराम उपरकर म्हणाले, सतिश सावंत व आपण पुर्वी एकत्र काम केले आहे. सतीश सावंत यांनी आता केवळ फुुलाचा सुवास दिला़ खरी सहवासाची गरज आहे़ त्यामुळे कणकवली तालुका पत्रकार संघाने आज एकाच व्यासपिठावर सर्वांना आणले़ विविध सामाजातील घटकांना त्यांच्या कर्तुत्वाला प्रेरणा देण्यासाठी पुरस्कार दिले़ त्याबद्दल कणकवली तालुका पत्रकार संघाचे कौतुक आहे़
गणेश जेठे म्हणाले, लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार कष्टाने, प्रामाणिकपणे काम करतो परंतू समाज किंवा शासन त्यांची दखल घेत नसल्याबद्दलचे शल्य आहे़ इलेक्ट्रॉनिक मिडीयात वाढ झाली तरी प्रिंट मिडीयाने आपले स्थान टिकवून ठेवले असल्याचे नगराध्यक्ष समिर नलावडे यांनी व्यक्त केले़
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकासंघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन राजेश कदम यांनी केले. तर संघाचे सचिव नितीन सावंत यांनी आभार मानले.
मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गजानन नाईक व सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी गणेश जेठे, उपाध्यक्षपदी रमेश जोगळे व कार्यकारीणी सदस्य पदी सुधीर राणे यांची निवड झाल्याबद्दल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पत्रकार संघाच्यावतीने आयोजित निबंध स्पधेर्तील विजेते खुल्या गटात भिरवंडे येथील प्रथम किरण मोतीराम सावंत, द्वितीय सुरेखा शामसुंदर परब, ओसरगाव, तृतीय हेमंत मोतीराम पाटकर, कणकवली, उत्तेजनार्थ – प्रतिक्षा भगवान तेली, फोंडाघाट कॉलेज. तर शालेय गटात प्रथम सिद्धी सुरेंद्र मोरे-विद्यामंदिर हायस्कूल, द्वितीय- समीक्षा सतीश कामत, तृतीय- भक्ती शंकर राठोड (दोन्ही न्यु इंग्लीश स्कूल, फोंडाघाट), उत्तेजनार्थ – ऋतिका रविकांत पेंडूरकर (माध्यमिक विद्यालय, कनेडी) यांना पारितोषिक देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.