बाबू सावंत यांचा टोला: रस्त्यावरून सार्वजनिक बांधकाम विभाग टार्गेट
सावंतवाडी. ता,२९: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणा मुळे सावंतवाडी तालुक्यातील मुख्य रस्ते खड्डेमय झाले आहेत. सद्यस्थिती लक्षात घेता गावातील ओहोळात चालता येऊ शकते,परंतु रस्त्यावर चालणे मुश्कील आहे असा टोला पंचायत समितीचे सदस्य बाबू सावंत यांनी आज येथे आयोजित बैठकीत लगावला.
दरम्यान रस्त्याच्या प्रश्नावरून सदस्य रुपेश राऊळ, संदीप गावडे,मनिषा गोवेकर आदींनी बांधकामच्या अधिकाऱ्यांना टार्गेट केले. चतुर्थी पूर्वी लवकरात लवकर रस्त्यांची परिस्थिती सुधारा अन्यथा अपघात झाल्यास तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
सावंतवाडी पंचायत समितीची मासिक सभा आज सभापती पंकज पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती संदीप नेमळेकर,गटविकास अधिकारी गजानन भोसले आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना टार्गेट करण्यात आले जिल्ह्यातील रस्त्यांसाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी करोडो रुपयांचा निधी आणला असे वेळोवेळी जाहीर केले आहे.मात्र प्रत्यक्षात रस्त्यांची परिस्थिती काय ? असा प्रश्न करत गावातील ओहोळात चालले सोपे परंतु रस्त्यावर चालणे कठीण बनले आहे असा टोला मारला. तात्काळ रस्त्यांची डागडुजी करण्यासंदर्भात योग्य ते हे निर्णय घ्या थुक-पट्टी लावू नका असे त्यांनी सांगितले. यावेळी सदस्य रुपेश राऊळ व संदीप गावडे यांनी बांधकाम प्रशासनाचे लक्ष वेधले आंबोली घाट धोकादायक आहे. घाट सुरू करण्यात आला असला तरी घाटावर धोक्याची घंटा कायम आहे.त्यामुळे घाटात रिफ्लेक्टर बसवा असे त्यांनी सांगितले. धोकादायक ठिकाणी आवश्यक ती उपाययोजना करा असे गावडे यांनी सांगितले यावेळी मनीषा गोवेकर यांनी रस्त्याच्या प्रश्नावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले तालुक्यातील सर्वच रस्ते खराब झाले आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला.
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=9ErxP4UvtNQ[/embedyt]