पाठपुरावा केल्यास कोणतेही काम अशक्य नाही

165
2
Google search engine
Google search engine

पाच वर्षाच्या कामावर मी समाधानी
वार्तालाप कार्यक्रमात आ. नाईक यांचे मत

सिंधुदुर्गनगरी.ता,२९: गेल्या पाच वर्षात मी कुडाळ-मालवण मतदार संघातील प्रत्येक वाडीत पोहोचलो. अशी एकही वाडी नाही, जिथे मी विकासकाम केले नाही. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघाची तुलना केल्यास सर्वाधिक निधी मी माझ्या मतदार संघात नेला. पण पाठपुरावा केल्याशिवाय अधिकारी कामे करीत नाहीत, हा अनुभव मला मिळाला. त्याच बरोबर पाठपुरावा केल्यास कोणतेही काम अशक्य नाही, याची खात्रीही मला झाली आहे, असे मत आ. वैभव नाईक यांनी जिल्हा मुख्यालय पत्रकार समिती आयोजित ‘वार्तालाप’ कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
मुख्यालय पत्रकार संघाचा मासिक ‘वार्तालाप’ हा कार्यक्रम गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात संपन्न झाला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, बाळ खडपकर, देवयानी वरसकर, विनोद दळवी, नंदकुमार आयरे, गिरीश परब, मनोज वारंग, लवु म्हाडेश्वर, दत्तप्रसाद वालावलकर, संजय वालावलकर, तेजस्वी काळसेकर, रवी गावडे, गुरुप्रसाद दळवी आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ नाईक यांनी, पाच वर्षापुर्वी ज्या विश्वासाने या मतदार संघातील जनतेने मला निवडून दिले. तो विश्वास आपण सार्थकी लावल्याचा मला विश्वास आहे. तसेच गेल्या पाच वर्षाच्या कामावर मी पूर्ण समाधानी आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मला पुन्हा याच मतदार संघातील उमेदवारी जाहिर केली आहे. कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे होणाऱ्या निवडणुकीत मतदार पुन्हा मला निवडून देतील असा विश्वास मला आहे, असे ठाम मत आ नाईक यांनी व्यक्त केले.
यावेळी पाच वर्षातील कालावधीतील कामकाजाचा आढावा घेताना आ नाईक यांनी, मी आमदार फंडासह २५/१५ निधी, जिल्हा नियोजन निधी, राज्य सरकारचा थेट निधी त्यापुर्वीच्या १५ वर्षापेक्षा जास्त आहे. कुडाळ या एका तालुक्यात एक हजार पॉवर ट्रिलर मंजूर झाले आहेत. ही आकडेवारी महाराष्ट्रातील कोणत्याही तालुक्यांपेक्षा जास्त आहे. मालवण, कुडाळ, सिंधुदुर्गनगरी या तिन्ही एसटी स्टॅण्डचे काम सुरु आहे. मालवणची नळयोजना मंजूर केली. भुयारी गटार योजनेसाठी निधी आणला. पर्यटन जेठी उभारली. वीज दाब वाढण्यासाठी सबस्टेशन सुरु केले. पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून महत्वाचे 25 ते 30 रस्ते मंजूर करून घेतले. कृषि यांत्रिकीकरणासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला.
पारंपारिक मच्छीमार यांचा पर्सनेट विषय निकाली लावल्यावर एलईडी विषय आला. तो विषय सोडविल्यावर फिशमिल जीएसटी विषय आला आहे. तो सुद्धा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्याशी बोलून सोडविणार आहोत. चांदा ते बांदा योजनेतून सर्वाधिक निधी माझ्या मतदार संघात आणण्यात मी यशस्वी झालो आहे. मी प्रत्येक आठवड्याच्या मंगळवार-बुधवारी कामे मार्गी लावण्यासाठी मुंबईत असायचो. बाकीचे दिवस मतदार संघात फिरायचो. मुंबई-गोवा महामार्ग हे लक्षवेधी काम असून घावनाळे फाट्यावर अंडर पास ब्रिज मंजूर करून घेतले आहे. केवळ वनसंज्ञा व टाळबा प्रकल्प ही दोन कामे अपूर्ण राहिली आहेत. ती पुढील कालावधीत सोडविण्याचा विश्वास माझ्यात निर्माण झाला आहे. मतदार संघातील तरुणांना नोकऱ्या मिळण्यासाठी कुडाळ एमआयडीसीमध्ये भात गिरण, गोदरेज कंपनी सुरु केली आहे. १० कोटी खर्चाचा बांबू क्लस्टर मंजूर करून घेतला आहे.

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=9ErxP4UvtNQ[/embedyt]