विष्णु गावडे;अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण…
सिंधुदुर्गनगरी ता.२९: साळेल येथील शिवकालीन पाणी साठवण योजनेंतर्गत झालेल्या साडे आठ लाखाच्या आर्थिक अपहार प्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करावी अशी मागणी उदय विष्णु गावडे यांनी करत न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल असा ईशाराही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
मालवण तालुक्यातील साळेल येथील ग्रामस्थ उदय विष्णू गावडे यांनी आज जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साळेल येथे शिवकालीन शेततळी दाखवून ८ लाख ६७ हजार ८०० रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याबाबत गेली दोन वर्षे सर्व पुरावे देवून व पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. माहितीच्या अधिकारात माहिती घेतली असता ग्राम विकास अधिकारी यांनी आपल्या जबाबात मी हे काम करायला तयार नव्हतो परंतू तत्कालीन सरपंचांनी आपल्यावर दबाव आणून संबंधित काम करून घेतले असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणी प्राथमिक चौकशीत पाणी पुरवठा अध्यक्ष, सचिव व संबंधित ठेकेदार आणि तांत्रिक सेवा पुरवठादार हे दोषी आढळले आहेत तरी त्यांच्यावर अद्याप करवाई झालेली नाही.
ग्रामपंचायत पाणी पुरवठा सचिव यांची निवड २३ डिसेंबर २०१० रोजी झाली आहे असे असतानाही त्यांनी २७ सप्टेंबर २००९ पासून बँकेतून पैसे काढले आहेत. तशी कॅशबुक रजिस्टरमध्ये नोंद आहे. साळेल येथे ज्या ठिकाणी शेततळी दाखविण्यात आली तेथे कोणतीही वाडी अथवा घरे नाहीत. तसेच शिवतळी वैगरे काही नसून २००७ साली बांधण्यात आलेली विहीर आहे. तशी तलाठी दप्तरी नोंद आहे. त्या विहिरीला शेततळीचा प्रस्ताव दाखवून ८ लाख ६७ हजार ८०० रुपयांचा आर्थिक अपहार संगनमताने करण्यात आला आहे. त्यासाठी पाणी पुरवठा अध्यक्ष, ठेकेदार, सचिव तसेच तांत्रिक सेवा पुरवठादार हे जबाबदार असून संबंधित दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करत आपल्याला न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण छेडणार असल्याचा ईशारा उदय गावडे यांनी दिला आहे.