फोंडाघाट महाविद्यालयात सुदृढ भारत अभियानास प्रारंभ…

2

फोंडाघाट ता.३०: सुदृढ भारतासाठी सुदृढ जनतेची आवश्यकता आहे. धावपळीच्या युगात नियमित व्यायाम व योग्य आहार घेतल्यास निरोगी व सुदृढ राहता येते. युवावर्गाने निराशेच्या गर्तेत सापडून व्यसनाच्या आहारी जाऊ नये. नियमित व्यायाम व ध्यानधारणा केल्यास शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते असे प्रतिपादन प्र. प्राचार्य डॉ. सतीश कामत यांनी केले.ते फोंडाघाट महाविद्यालयातील एनएसएस विभागाने आयोजित केलेल्या सुदृढ भारत (फिट इंडिया) या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी एनएसएस विभाग प्रमुख प्रा. डॉ. बालाजी सुरवसे प्रा. जगदिश राणे प्रा. संतोष आखाडे प्रा. विनोदसिंह पाटील प्रा. रूपाली माने आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात प्रा. डॉ. बालाजी सुरवसे म्हणाले की, क्रीडापटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी या अभियानाला सुरुवात केली आहे. सुदृढ भारताच्या निर्मितीसाठी खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे. युवकांना प्रोत्साहन देणे हे या अभियानाचे प्रमुख लक्षण लक्ष आहे. यातूनच भविष्यातील फिट इंडिया आकाराला येणार आहे. सुदृढ भारताच्या जडणघडणीसाठी एनएसएस राबवित असलेले कार्यक्रमांची माहिती प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांनी दिली.
प्रा. जगदिश राणे यांनी सर्व प्रकारची व्यसने माणसाला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या दुर्बल बनवतात असे सांगितले यामुळे व्यसनांची कधीच सोबत करू नका असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. शिवाय बदलती जीवनशैली हे शारीरिक दुर्बलतेचे लक्षण महत्त्वाचे कारण असून जंग फुडचे सेवन टाळायला हवे असे सांगून सकस आहार घेतल्याने सुदृढ आणि निरोगी राहता येते असे प्रा. राणे म्हणाले. मोबाईलचा अतिवापर कसा घातक आहे याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास आपले मनोगत व्यक्त करताना प्रा. विनोदसिंह पाटील यांनी चांगला आहार विहारा बरोबरच चांगला विचार मनुष्याला सुंदर बनवतो असे मत मांडले. त्यांनी शारीरिक स्वास्थ्या बरोबर मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व विशद केले. आज मानसिक रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.अपेक्षाभंगाचे दुःखातून मानसिक स्वास्थ्य बिघडते त्यासाठी मानसिकदृष्ट्या कणखर बनण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमात सुदृढ भारताची शपथ एनएसएस विभाग प्रमुख प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यानी सर्व विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाचे शेवटी प्रा. रूपाली माने यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्रा. डॉ. संतोष रायबोले, प्रा. देवराव ताडेराव, प्रा.डॉ.बाजीराव डाफळे प्रा. सारिका राणे प्रा. मयुरी सावंत आदी उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. वसंत शेकडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

24

4