मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन…

2

वैभव नाईक; १ सप्टेंबरला कुडाळ येथे आयोजन…

कुडाळ ता.३०: सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच मुंबई-पुणे शहराच्या धर्तीवर कुडाळ येथे उभारण्यात येणाऱ्या “मच्छिंद्र कांबळी” नाट्यगृहाचे भूमिपूजन रविवार दिनांक १ सप्टेंबर रोजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी खासदार विनायक राऊत,जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे,कुडाळ पंचायत समिती सभापती राजन जाधव,कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
आमदार नाईक यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटल्या प्रमाणे,मालवणी भाषा नाटकाच्या माध्यमातून सातासमुद्रापार नेणारे नाट्यकर्मी मच्छिंद्र कांबळी यांच्या नावाचे नाट्यगृह मतदारसंघात व्हावे अशी आपली इच्छा होती.त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दीपक केसरकर, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, खासदार विनायक राऊत, यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून कुडाळ येथे मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहासाठी १२ कोटी ४५ लाख ९० हजाराचा निधी मंजूर करून घेतला.राज्य सांस्कृतिक विभाग व राज्य व जिल्हा नगरोत्थान योजनेतून हा निधी देण्यात येणारआहे.
नाट्यगृहासाठी कुडाळ तहसील कार्यलया नजीक शासकीय जागा निश्चित करण्यात आली असून ७० गुंठे जागा शासनाकडून संपादित करण्यात आली आहे. नाट्यगृहात रसिकांसाठी ६५० एवढी आसनक्षमता असून नाट्यगृहाचे एकूण बांधकाम १७५२३ चौ . फूट एवढ्या क्षेत्रात करण्यात येणार आहे.
या नाट्यगृह इमारतीतून न. पं. ला उत्पनाचे साधन म्हणून व्यावसायिक गाळे ठेवण्यात आले आहे. जेणेकरून त्यातून इमारतीचे मेंन्टेनस करता येईल. यातील एकूण रकमेच्या ५ टक्के निधी कुडाळ न. पं. ला आपल्या फ़ंडातून भरावा लागणार आहे.कुडाळ येथील प्रभू इंजिनीअरिंग या ठेकेदार कंपनीकडे या कामाची निविदा असून या इमारतीच्या बांधकामावर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार आहे.अशी माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली.

सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वांनाच होणार लाभ

सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कुडाळ तालुक्यात नाट्य चळवळ मोठी आहे. येथे मोठ्या प्रमाणात दशावतार नाट्य कलाकार आहेत.सिंधुदुर्गात प्रथमच होणाऱ्या या मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाचा सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व कलाकारांना, संस्थांना लाभ होणार आहे.कलाकारांच्या सोयीसाठी या नाट्यगृहात एम्पी थिएटर ठेवण्यात आले आहे.

10

4