जास्त रक्कम कोण घेत असल्यास तक्रार करण्याचे आरटीओचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी ता.३०;: वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राच्या नुतनिकरणासाठी लागणारे विशिष्ठ प्रकारचे रेडियम लावून त्याबाबतचे ऑनलाइन प्रमाणपत्रासाठी योग्य व वाजवी रक्कम घेतली जात असून या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम कोण घेत असल्यास वाहन चालकांनी आरटीओ विभागाकडे तक्रार द्यावी असे आवाहन प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी यांनी केले आहे.
वाहनांना विशिष्ठ प्रकारची रेडियम बसविण्याचे केंद्र शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्यासाठी आवश्यक असणारे रेडियम बसुवन त्याचे ऑनलाइन प्रमाणपत्र सादर करने बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार आरटीओ विभाग कार्यवाही करत आहे. पूर्वी बाजारात मिळणाऱ्या रेडियम पेक्षा आताच्या रेडियमची किंमत जास्त आहे. ही रेडियम बसविल्यानंतर त्या वितरकाकडून वाहनधारकास ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात येते. तेही वाजवी दरात.
ऑटो रिक्षा साठी ६०० ते ६५० रूपये, मालवाहू वाहन ३४०० ते ३५०० रूपये तर मोठ्या बसेससाठी ४४०० ते ४५०० रूपये एवढा खर्च येतो. यात वाहनांना रेडियम चिकटविणे, वाहनांचे फोटो घेणे, ते अपलोड करणे, प्रमाणपत्र देणे ते अपलोड करणे आदि प्रकारची कामे केली जातात. त्यांचा एकत्रित मोबदला म्हणून ही रक्कम घेतली जाते आणि ही रक्कम योग्य व वाजवी असल्याचे आरटीओ विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम कोण घेत असल्यास वाहन चालकांनी आरटीओ विभागाकडे तक्रार द्यावी असे आवाहन प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी यांनी केले आहे.