पालिका सभा ; आरक्षण २१ रद्दची उपसूचना फेटाळली…
मालवण, ता. ३० : मालवण पालिकेची सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून वादळी ठरली. शहरातील समस्यावरून छेडलेल्या उपोषणावरून नगरसेवक यतीन खोत, गणेश कुशे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. आरक्षण २१ रद्द करण्याच्या विषयावरून मंदार केणी यांनी मांडलेली उपसूचना १० विरुद्ध ६ मतांनी फेटाळण्यात आली.
मालवण पालिकेची सभा नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. सभेत गणेश कुशे यांच्या उपोषणाच्या विषयावरून यतीन खोत यांनी हे उपोषण म्हणजे एक स्टंट असल्याची टीका केली. यावर कुशे यांनी खोत यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. हे उपोषण मागील मुख्याधिकाऱ्यांच्या काळात होणे गरजेचे होते. उपनगराध्यक्ष वराडकर यांनी कुशेंनी जनतेसाठी आंदोलन केल्याचे स्पष्ट केले. आम्ही फोटोसेशन करत नाही असे सांगताच खोत यांनी केलेल्या कामाची माहिती होण्यासाठी फोटोसेशन होते. त्यासाठी जनमानसात राहून काम करावे लागते. एसीत बसून कामे होत नाहीत असा टोला लगावला. या विषयावरून कुशे- वराडकर व खोत यांच्यातील वाद वाढत असल्याचे दिसून येताच सुदेश आचरेकर यांनी मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकला.
प्रशासन हे बिल्डर लॉबीसाठीच काम करत असल्याचा गंभीर आरोप सुदर्श आचरेकर यांनी केला. बिल्डरांच्या बेकायदेशीर बांधकामाची चौकशीचे धाडस ते दाखवत नाहीत. स्थायी समितीला कोणीही जुमानत नाही. नगराध्यक्ष ५८(२) चा वापर चुकीच्या ठिकाणी करत आहेत. प्रशासन निर्ढावलेले आहे. बिनधास्तपणे जनतेला त्रास देत आहेत. परिणामी पालिकेची प्रतिष्ठा धुळीस मिळाल्याचा आरोप त्यांनी केला.
स्थायी समितीची मान्यता असताना कार्यारंभ आदेश काढताना पाचपैकी केवळ दोनच कामे दाखविल्याचे दिसून आले. यामुळे स्थायी समितीच्या ठरावांना किंमत नाही काय? असा प्रश्न उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी उपस्थित केला. यामागील शुक्राचार्य कोण हे आम्हाला माहित आहे. यावर योग्यवेळी सभागृहात बोलू असा इशारा त्यांनी दिला. नाकारलेल्या कामांना मंजुरी दिली आहे. शिवाय पूर्वी झालेल्या कामांनाही मान्यता दिल्याचे यादीत दिसत असल्याचे कुशे यांनी सांगितले. अखेर नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी स्थायी समितीच्या मान्यतेनुसारच कामे केली जातील असे सांगितले.