गणेशोत्सवात आरोग्य यंत्रणेला सतर्ककेचे आदेश

2

वेंगुर्ले पंचायत समिती मासिक सभा संपन्न

वेंगुर्ले.ता,३०: गणेशोत्सवामध्ये गावागावात चाकरमानी दाखल होणार आहेत. तसेच यावर्षी पडलेला पाऊस व निर्माण झालेली पुरस्थिती यामुळे साथीचे रोग फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही. गणपतीचा सण सर्वांना निरोगी साजरा करता येण्यासाठी आरोग्य विभागाने सर्तक राहणे आवश्यक आहे. यासाठी गणेश चतुर्थी कालावधीत आरोग्य पथके कार्यान्वित करण्याचे आदेश सभापती सुनिल मोरजकर यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत संबंधित विभागांना दिले आहेत.
वेंगुर्ला पंचायत समितीची मासिक सभा सभापती सुनिल मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली बॅ.नाथ पै सभागृहात संपन्न झाली. यावेळी उपसभापती स्मिता दामले, गटविकास अधिकारी उमा पाटील, पंचायत समिती सदस्य यशवंत परब, सिद्धेश परब, मंगेश कामत, शामसुंदर पेडणेकर, साक्षी कुबल, अनुश्री कांबळी, प्रणाली बंगे, गौरवी मडवळ आदी उपस्थित होते. या सभेत यशवंत परब तालुक्यातील ग्रामपंचायतमधील संगणक परिचालक यांचे मानधन वेळेवर मिळावे व त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे,असा तर साक्षी कुबल यांनी आडेली-भंडारवाडी टॉवरसाठी ट्रान्सफॉर्मर बाबत ठराव मांडला. तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गटारांची व्यवस्था याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रातील विद्युतीकरणाचे काम अर्धवट असून सभापतींनी पाहणी करावी,अशी सूचना साक्षी कुबल यांनी मांडली.
अनुश्री कांबळी यांनी इलेक्ट्रिक विभाग व एस.टी.महामंडळाने गणेश चतुर्थी कालावधीत चांगली सेवा द्यावी अशी सूचना मांडली. रेडी गावातील माड बागायतीचे नुकसानभरपाई कधी मिळणार असा सवाल मंगेश कामत यांनी उपस्थित केला. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहता नये यासाठी लवकरात लवकर पंचनामे करा असे सर्वच सदस्यांनी सुचविले आहे. दरम्यान प.स. मध्ये नव्याने दाखल झालेल्या गटविकास अधिकारी उमा पाटील यांचे यावेळी सभापतींच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

 

11

4