बांद्यातील रोहीत कशाळीकर खुल्या छायाचित्रण स्पर्धेत प्रथम

2

बांदा.ता,३०: मुंबई येथील अॅपिक फोटोफ्राय संस्थेमार्फत आयोजित खुल्या छायाचित्रण स्पर्धेत बांदा येथील सुप्रसिद्ध छायाचित्रकार रोहित कशाळीकर यांच्या ‘फ्लॉवर’ फोटोग्राफीला प्रथम क्रमांक मिळाला आहे. तब्बल ५०० पेक्षा अधिक छायाचित्रांमधून ही निवड झाली आहे. ‘पीपल’ फोटोग्राफी विषयातही त्यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे. त्यांच्या दुहेरी यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मुंबई येथील आर्ट फोटोग्राफी अॅडव्हेंचर क्राफ्ट ट्रेनिंग अॅण्ड सर्व्हिसेस अर्थात अॅपिक फोटोफ्राय या संस्थेमार्फत मुंबईत खुल्या छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी नवनवीन विषय घेऊन ही स्पर्धा भरविण्यात येते. स्पर्धेचे यंदाचे ७ वे वर्ष आहे. यंदा फ्लॉवर, पीपल व अॅनिमल हे तीन विषय देण्यात आले होते. या स्पर्धेसाठी ५०० पेक्षा अधिक छायाचित्रांचा सहभाग झाला होता. त्यातून ५० छायाचित्रे स्पर्धेसाठी निवडण्यात आली होती. त्यातून अंतिम ५ छायाचित्रांसाठी ओपन जजिंग पद्घतीने परीक्षण करण्यात आले. त्यात बांदा येथील रोहीत कशाळीकर यांनी फ्लॉवर विषयात प्रथम तर पीपल प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला.
प्रसिद्ध लेखिका तथा दिग्दर्शिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी, निर्माता सबा गाझियानी यांच्या हस्ते सर्व विजेत्या स्पर्धकांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लेखिका भक्ती चपळगावकर, लघुपट निर्माती मानसी देवधर व सबा गझियानी यांनी काम पाहिले.

13

4