गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज

2

22 ठिकाणी मदत केंद्रे
चार चाकी वाहनांसह दुचाकी दिमतिला

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गा वरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी खारेपाटण ते बांदा पर्यंत 22 फिक्स पाॅईंट (मदत केंद्र) निश्चित केले असून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात बारा जीप व 26 मोटारसायकल द्वारे अहोरात्र पेट्रोलिंग केले जाणार आहेत. वाहतूक सुरळीत व्हावी, कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्ह्य़ात अपर पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली 137 पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत. महामार्गासह आंबोली, करूळ व गगनबावडा घाटात पोलीस पेट्रोलींग करणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी दिली.
गणेश चतुर्थी च्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांना पोलीस बंदोबस्त व वाहतूक व्यवस्थेबाबत विचारले असता ते म्हणाले, गणेशोत्सवाचा सण हा सिंधुदुर्गसह कोकणात सर्वात महत्त्वाचा सण असून हा सण मोठ्या भक्तिभावाने व मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात मुंबई, पुणे आदी मोठ्या शहरातून मोठ्या संख्येने चाकरमानी सिंधुदुर्गात आपल्या गावी येत असतात. हे चाकरमानी रेल्वे, एसटी- बसेस, खाजगी बसेस, तसेच स्वतःच्या खाजगी वाहनांनी ही दाखल होतात. त्यामुळे या कालावधीत मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर व्हावा तसेच कोणत्याही प्रकारचे सहाय्य आधी या चाकरमान्यांना लागले तर ते तत्काळ पुरविता यावे, महामार्गावर कोणत्याही प्रकारची गाड्यांची कोंडी होऊ नये याबाबत पोलीस विभागाकडून गणपती पूर्वीच आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे.
मदत केंद्रा प्रमाणेच महामार्गावर 7 रावटी(तंबु) उभारण्यात येणार आहेत. तसेच पेट्रोलिंग करण्यात येणार आहेत. यासाठी खास 12 जीप व 26 मोटारसायकल चा समावेश आहे. रेल्वे स्थानक, वाढत्या रहदारीच्या ठिकाणी व महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गणपती उत्सवात ध्वनी क्षेपनासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. रात्री 10 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपनास परवानगी आहे. पाच, सात,नऊ व अकराव्या दिवशी ध्वनीक्षेपन साठी दोन तास वाढवून दिले आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्ह्य़ात 30 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत नियमन आदेश लागू केले आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक गेडाम यांनी दिली.

box…22 ठिकाणी मदत केंद्र
मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण ते बांदा या महामार्गावर एकूण 22 महत्त्वाचे पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत. ही मदत केंद्र खारेपाटण, कासार्डे, फणसगाव तिठा, एसएम हायस्कूल, पटवर्धन चौक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक समोर,कणकवली बस स्थानक, आबू तायशेटे हाॅस्पीटल रोड, तायशेटे नाका, वैभव नाईक पेट्रोलपंप वागदे, संभाजी चौक वैभववाडी, कसाल पुल, कसाल बस स्थानक, ओरोस फाटा, पणदूर तिठा, वेताळ बांबर्डे तिठा, राज नाका कुडाळ, आरएसएन हाॅटेल कुडाळ, साळगांव तिठा, खामदेव नाका इन्सुली याठिकाणी मदत केंद्र उभारण्यात येणार आहे. महामार्गावर चाकरमानी किंवा अन्य वाहनधारकांना तातडीची मदत मिळावी यासाठी ही केंद्र उभारण्यात येणार आहेत. या सर्व पॉइंट वर आवश्यकतो पोलीस बंदोबस्त राहावा राहणार आहे.

box..खारेपाटण येथे चाकरमान्यांसाठी क्षणभर विसावा
मुंबई वरून तासनतास प्रवास करून चाकरमानी गावी दाखल होतात. प्रवासा दरम्यान चालक थकतात. त्यांना क्षणभर विश्रांती मिळावी यासाठी खारेपाटण चेक पोस्ट येथे जिल्हा पोलीस प्रशासनाने ‘क्षणभर विश्रांती’ कक्ष सुरू केला आहे. या कक्षात चहा, पाणी व बायोटाॅयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी केले आहे. याच वेळी वाहतूकीचे नियम, भाविकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता याबाबत स्क्रीन द्वारा लोकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.

box..सोशल मिडीयावर राहणार वाॅच
सोशल मीडीयावर आक्षेपार्ह मजकूर लिहीने, कायदा सुव्यवस्था बिघडेल अशा पोस्ट शेयर करण्या-यावर कारवाई केली जाणार आहे. याकडे आमचे बारिक लक्ष राहणार आहे. गणेश चतुर्थी सण आनंदात व भक्ती पूर्ण वातावरण साजरा करा. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेवून पोलीस प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी केले आहे.

box..137 पोलीस व 30 होमगार्ड तैनात
जिल्ह्य़ात गणपती सणाच्या पार्श्‍वभूमीवर 1 अपर पोलीस अधीक्षक, दोन डीवायएसपी, 26 पोलीस अधिकारी, 79 पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस 29 व 30 होमगार्ड तैनात राहणार आहेत. महामार्गावर अपघात घडल्यास तत्काळ मदत केली जाणार आहे. आरोग्य यंत्रणेसह, जेसीबी व क्रेन तैनात करण्यात येणार आहे.

13

4