मालवण, ता. ३० : देशभरातील फिशमिलना लावलेल्या जीएसटी संदर्भात १९, २० सप्टेंबरला गोवा येथे होणार्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिल्ली येथे स्पष्ट केले. त्यामुळे देशभरातील फिशमिलधारकांनी आज आपला संप मागे घेतला. उद्यापासून फिशमिल धारकांकडून मासळी खरेदी केली जाईल अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली.
मच्छीमारांची मासळी खरेदी करणार्या फिशमिलधारकांना केंद्र शासनाने मागील तीन वर्षाची जीएसटी भरण्याच्या नोटिसा बजावल्या. प्रत्यक्षात मागील तीन वर्षांची जीएसटी भरणे शक्य नसल्याने देशभरातील सुमारे ५६ फिशमिलधारकांनी गेले महिनाभर आपल्या फिशमिल बंद ठेवत संप पुकारला. मच्छीमार हंगाम सुरू झाल्यानंतर पारंपरिक मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात मासळी मिळूनही त्याची खरेदी फिशमिलकडून होत नसल्याने त्यांना मासळी किनार्यावरच फेकून द्यावी लागत होती.
या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. यावेळी देशभरातील ५६ फिशमिलधारकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत श्रीमती सीतारामन यांनी १९, २० सप्टेंबरला गोवा येथे जीएसटी कौन्सिलची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीस विविध राज्यांचे अर्थमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सर्व अर्थमंत्र्यांशी या समस्येसंदर्भात चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासित केले. त्यामुळे फिशमिलधारकांनी आज आपला संप मागे घ्यावा असे स्पष्ट केले. त्यानुसार देशभरातील फिशमिलधारकांनी आपला संप मागे घेतला. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र तसेच देशभरात अशा एकूण ५६ फिशमिलधारकांनी संप मागे घेतला आहे. उद्यापासून मच्छीमारांची मासळी खरेदी करणार आहेत.