बचतगटांच्या माध्यमातुन महिलांना चांगला रोजगार

2

सतीश सावंत;गणेश चतुर्थीसाठी बचतगटांच्या पदार्थांची गावठी बाजारपेठेत विक्री…

कणकवली ता.३१: ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गावागावातील महिला बचतगट चांगल्या पद्धतीने काम करत आहेत.महिलांना रोजगार मिळाल्याने कुटुंबातील अर्थव्यवस्थेला हातभार लागत आहे.पंचायत समितीच्या माध्यमातुन खास गणेश चतुर्थीच्या कालावधीत गावठी आठवडा बाजार आयोजित करुन महिलांच्या रोजगाराला चालना देण्याचे काम करण्यात आले आहे. पुढील काळात दिवाळी सणाच्या निमित्ताने तालुक्यातील बचत गटांना एकत्रित आणुन दिवाळीचा फराळ सेंद्रीय व आरोग्य हितकारक असा आकर्षक पॅकींग करुन बाजारात विक्री करण्यासाठी नियोजन करावे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.
गणेश चतुर्थीनिमित्त कणकवली पंचायत समिती व उमेद अभियान कणकवलीच्यावतीने ‘खास गावठी बाजाराचा’ शुभारंभ फित कापुन सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी कणकवली नगराध्यक्ष समिर नलावडे, सभापती सुजाता हळदिवे, उपसभापती सुचित्रा दळवी, गटविकास अधिकारी मनोज भोसले, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, महेश लाड, प्रकाश पारकर, हर्षदा वाळके, संदीप मेस्त्री, शामसुंदर दळवी, जेष्ठ पत्रकार विजय शेट्टी, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष भगवान लोके,पंचायत समिती अधिक्षक प्रमोद पालकर, विस्तार अधिकारी सुर्यकांत वारंग, रविकांत मेस्त्री, उमेदचे शिवाजी खरात, यशवंत लाड, उपअभियंता रमाकांत सुतार, कृषी अधिकारी श्री. पवार, बापु सावंत, पांडुरंग घुरसाळे आदीसह तालुक्यातील बचतगटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सतीश सावंत म्हणाले, या गावठी आठवडा बाजाराला मिळालेला प्रतिसाद पाहता गणपतीनंतर दिवाळी सण येणार आहे. या दिवाळीसाठी तयार फराळ आकर्षक पॅकींगमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करावा. सर्व बचतगटांकडुन चांगल्या दर्जाचा फराळ त्यामध्ये मुगाचे लाडु, करंजा, गुळाची चुणकाप, चिवडा व अन्य साहीत्य पंचायत समितीने खरेदी करावे. त्यानंतर एकाच ब्रॅण्डखाली त्या फराळाची विक्री करण्याच्यादृष्टीने आतापासुनच नियोजन करावे. त्यामुळे दिवाळातही बचतगटातील महिलांना चांगले काम मिळेल. त्यातुन आर्थिक नफा देखील सर्वांना मिळु शकेल.
खास गावठी बाजारामध्ये गणेश चतुर्थीसाठी लागणारे पुजेचे साहीत्य, लाडु, करंजा, मोदक व विविध बचतगटांचे साहीत्य विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्यात आले आहे. या गावठी आठवडा बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची चांगली उपस्थिती होती.या गावठी बाजारात सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी उकडीचे मोदक स्वत: खरेदी करुन वाटप केले. तसेच नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी या बाजारात काजु मोदक, लाडु, चकल्या व इतर साहीत्य खरेदी केले. हा गावठी आठवडा बाजार रविवारी पुर्णदिवस सुरु ठेवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात उपस्थित राहणाºया सर्व मान्यवरांचे सभापती सुजाता हळदिवे यांनी पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले.

4

4