शिवसेना संपविण्याची भाषा करणारेच विसर्जित झाले विनायक राऊत:आंबडोसमधील परब, नकेंसह शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेत

2

मालवण, ता. ३१ : शिवसेना संपविण्याची भाषा अनेकांनी केली मात्र अशी भाषा करणारेच विसर्जित झाले आणि याउलट शिवसेना फोफावत राहिली. शिवसेना हे एक कुटुंब असून या कुटुंबात आज आंबडोसचे नेतृत्व माजी सरपंच दिलीप परब, दिगंबर नके यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी प्रवेश केला. येत्या काळात संपूर्ण आंबडोस गाव शिवसेनेच्या पाठीशी राहील असा विश्‍वास खासदार विनायक राऊत यांनी आंबडोस येथे व्यक्त केला.
आंबडोस येथील रवळनाथ मंदिरात आयोजित कार्यक्रमात आंबडोसचे माजी सरपंच दिलीप परब, दिगंबर नके यांच्यासह स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांसह शेकडो ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आंबडोस गावात शिवसेनेला खिंडार पडले आहे. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, संजय गावडे, मंदार गावडे, आशिष परब, बाळ महाभोज, विजय पालव, अमित भोगले, बाबी जोगी, मंदार शिरसाट, विशाल धुरी, दिनेश चव्हाण, आतू फर्नांडिस, श्री. सावंत, उपसरपंच भारती आयरे, ग्रामपंचायत सदस्य शुभांगी कदम, बाबू परब, शीतल कदम, दयानंद पाटकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले, ७५ टक्के अनुदानावर कृषी अवजारे उपलब्ध करून दिली जात आहेत. त्याचबरोबर प्रत्येक वाडीत कृषी बँक व्हावी यासाठी आपले प्रयत्न आहेत. रोजगाराच्या प्रश्‍नाबरोबर स्वयंरोजगाराचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून लोकांच्या हाताला काम कसे मिळेल. घरच्या घरी पैसे कसे कमविता येतील यादृष्टीकोनातून अनेक योजना आहे. त्या योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा. आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून अनेक विकासात्मक कामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे येथील जनता पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्‍वास टाकून त्यांना आमदार बनवतील. ते मंत्रीही होतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
आमदार नाईक म्हणाले, आंबडोसचे माजी सरपंच दिलीप परब, दिगंबर नके यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्वांना योग्य मानसन्मान पक्षात दिला जाईल. ग्रामस्थ जी भूमिका मांडतील ती पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील. बेरोजगारी दूर करण्याबरोबर शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. राजकीय समिकरणे कितीही बदलली तरी तुम्ही माझ्या पाठीशी राहिलात आणि यापुढेही राहाल असा विश्‍वास आहे. परब, नकेंच्या शिवसेना प्रवेशामुळे ही पंचक्रोशी ८० टक्के शिवसेनेची झाली आहे असेही त्यांनी सांगितले.
खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून गावातील अनेक विकासात्मक कामे मार्गी लागली आहेत. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळेच आम्ही शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यापुढे ८० टक्के नव्हे तर १०० टक्के गाव शिवसेनेच्या पाठीशी राहील असा विश्‍वास दिलीप परब यांनी यावेळी दिला.
यावेळी नागेंद्र परब, हरी खोबरेकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन करून दिनेश चव्हाण यांनी आभार मानले.

12

4