सभापतींच्या दणक्यानंतर ‘त्या’ मोरीची उंची कमी करण्याचे काम मार्गी… वाहनचालकांची गैरसोय दूर ; ग्रामस्थांतून समाधान…

2

मालवण, ता. ३१ : कोळंब- सर्जेकोट तिठ्यावरील रस्त्याखाली घातलेल्या मोरीच्या उंचीमुळे वाहनचालकांना होत असलेल्या त्रासाबद्दल सभापती सोनाली कोदे यांनी काल सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेताच आज सकाळीच मोरीची उंची कमी करण्याचे काम मार्गी लावण्यात आले.
कोळंब- सर्जेकोट तिठ्यावरील रस्त्याच्याखाली मोरी बसविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आले. मात्र रस्त्याच्या समान मोरीची उंची असणे आवश्यक असताना त्याची उंची वाढविण्यात आली. परिणामी या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. याप्रकरणी स्थानिकांनी सभापती सोनाली कोदे यांचे लक्ष वेधले. काल झालेल्या पंचायत समितीच्या सभेत सभापती सोनाली कोदे यांनी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत खडे बोल सुनावले. यावेळी बांधकामच्या अधिकाऱ्यांनी उद्या मोरीची उंची कमी करण्याचे काम केले जाईल असे स्पष्ट केले.
आज सकाळपासूनच बांधकाम विभागाच्यावतीने मोरीची उंची कमी करण्याचे काम हाती घेण्यात आले. मोरीची उंची रस्त्यासमान करण्यात आल्याने वाहनचालकांची गैरसोय दूर झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत सभापती सोनाली कोदे यांचे आभार मानले आहेत.

11

4