रायगड
महाड जवळील वडपाले गावाजवळ परळ-सावर्डे (रत्नागिरी) एसटी बसला आग लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनाच्या २ ते ३ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी ही दुर्घटना घडल्याने अनेक समस्यांवर मात करत मोठ्या संख्येने कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचा मोठा खोळंबा झाला आहे. या दुर्घटनाग्रस्त एसटी बसमध्ये एकूण ५७ प्रवाशी होते. मात्र, प्रसंगावधान राखल्याने सर्व प्रवाशी सुदैवाने सुखरुपपणे बसच्या बाहेर आले.
मुंबई-गोवा महामार्गावर पेन ते माणगाव दरम्यान झालेली वाहतूक कोंडी मोठी आहे. या वाहतूक कोंडीमुंळे पहाटे कोकणाकडे निघालेले चाकरमानी अडकून पडले आहेत.
गणेशभक्त चिंतेत
उद्या श्रीगणेशाचे आगमन होत असल्याने वेळातवेळ काढून आपल्या गावी काही तास आधी पोहोचून गणेशोत्सवाची तयारी करण्याची योजना घेऊनच सर्व गणेशभक्त कोकणात जात असतात. गणेशभक्तांना कपडे, धान्य, पूजेचे साहित्यासह इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टींची तयारी करायची असते. आज सकाळीच मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याने गणेशभक्तांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. गणेशोत्सवाची सर्व करावयाची कामे वेळेत पूर्ण कशी होणार याची चिंता म्हणूनच गणेशभक्तांना सतावते आहे.
महाडजवळील वडपाले गावाजवळ कोकणात जाणाऱ्या एका एसटी बसला अचानक आग लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांची संख्या मोठी असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांच्या संख्याही तितकीच मोठी आहे. अशात ही दुर्घटना घडल्याने कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या सुमारे २ ते ३ किलोमीटरच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.