वैभववाडीत गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग

161
2
Google search engine
Google search engine
Google search engine

चाकरमानी गावागावात दाखल; कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त

वैभववाडी/पंकज मोरे.ता,१: गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला सर्वत्र गणेशोत्सवाच्या तयारीची लगभग सुरू आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गेले दोन-तीन दिवस ग्राहकांची विक्रमी गर्दी दिसून येत होती. उत्सवासाठी येणारे चाकरमानी आपल्या कुटुंबांसमवेत गावागावात मिळेल त्या वाहनाने दाखल झाले आहेत. एकूणच उत्साही वातावरणात गणेशाचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत.
गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा कोकणात घराघरात गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. आजही तितक्याच भक्तीभावाने, श्रध्देने गणरायाचे घराघरात आगमन होते. वर्षभर कामधंद्यानिमित्त गावाबाहेर राहणारे कोकणवासिय या उत्सवासाठी आपल्या मुळगावी येवून हा सण साजरा करतात. यासाठी तालुक्यातील बाजारपेठाही सजल्या असून गणेश उत्सवासाठी लागणारे विविध आकाराचे, रंगाचे आकर्षक कापडी मकर, सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केलेली दिसत आहे. याचबरोबर गणेशोत्सवादरम्यान करण्यात येणाऱ्या ‘मेनूसाठी’ लागणारे साहित्य यासाठी ग्राहकांची मोठी मागणी दिसून येत आहे. गणेशोत्सव काळात वाहतूकीची कोंडी व कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

फोटो- गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी खरेदी करताना ग्राहक.

\