प्रमोद जठार यांची माहिती: वरिष्ठांचा निर्णय आम्हाला मान्य असेल
कणकवली, ता.१:माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा की नाही हे सध्यातरी शिवसेनेच्या हातात आहे. शिवसेनेकडून ग्रीन सिग्नल मिळाला तर राणेंचा भाजप प्रवेश लगेच होऊ शकतो. मात्र शिवसेनेकडून तशी शक्यता नाही. त्यामुळे युतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटेपर्यंत राणेंचा भाजप प्रवेश अधांतरीच आहे अशी भूमिका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज मांडली. दरम्यान राणेंबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असेही श्री.जठार म्हणाले.
श्री.जठार यांनी कणकवलीत भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिशिर परुळेकर, डामरेचे माजी सरपंच बबलू सावंत उपस्थित होते.
श्री.जठार म्हणाले, राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत सध्या बर्याच घडामोडी घडत आहेत. पण सद्यःस्थितीत शिवसेना काय भूमिका घेते यावरच राणेंच्या भाजप प्रवेशाचा मार्ग निश्चित होणार आहे. राणेंच्या भाजप प्रवेशावरून भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात मतमतांतरे आहेत. काहींचा विरोध तर काहींचा त्यांना पााठिंबा आहे. मात्र त्यांच्या प्रवेशाबाबतचा निर्णय आम्ही भाजप पक्षावर सोपवला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.
श्री.जठार म्हणाले, भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होणार की नाही यावर देखील राणेंचे भाजपमधील प्रवेशाचे भवितव्य अवलंबून आहे. जर युती तुटली तरी राणेंच्या भाजप प्रवेशाचा मार्ग सुकर होईल आणि युती झाली तर मात्र राणेंच्या प्रवेशामध्ये अडचण निर्माण होऊ शकते. गत विधानसभेत शिवसेनेने 62 तर भाजपने 121 जागा जिंकल्या होत्या. या जागा वगळता उर्वरित जागांवर 50-50 टक्के असा आमचा युतीचा फॉर्म्युला आहे. त्याला शिवसेना कितपत मान्यता देते हे देखील पाहणे महत्वाचे आहे असे श्री.जठार म्हणाले.